25/06/26
Breaking News

यशवंत सेनेची उद्या निर्णायक पत्रकार परिषद नगरपालिकेतील ‘अंधारातले व्यवहार’ उघडकीस येणार?

गंगाखेड प्रतिनिधी :
गंगाखेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नगरपालिकेच्या अंतर्गत कारभारात सुरू असलेल्या घडामोडींनी आता गंभीर वळण घेतले आहे. स्वाक्षरीवरून सुरू झालेला वाद, सर्वसाधारण सभेत मांडलेल्या ठरावांना झालेला ठोस विरोध, तसेच प्रशासकीय काळात ३० ते ३५ जणांची विविध पदांवर झालेली भरती — या सर्व बाबी आजवर संशयाच्या भोवऱ्यातच होत्या. मात्र आता यशवंत सेना या सर्व प्रकरणांचा पडदा फाश करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
आज होणारी पत्रकार परिषद काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली असून ती उद्या निश्चितपणे घेण्यात येणार आहे. या परिषदेत शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर, तसेच नगरपालिकेतील कथित गैरप्रकारांवर सविस्तर व आक्रमक भूमिका मांडली जाणार असल्याची माहिती पालिका उपाध्यक्ष सत्यपाल साळवे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.
विशेष म्हणजे, या पत्रकार परिषदेत केवळ आरोप-प्रत्यारोप न होता दस्तऐवजीकरणासह खुलासे, थेट जबाबदाऱ्या निश्चित करणारे मुद्दे आणि पुढील आंदोलनात्मक दिशा स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यशवंत सेनेचे नगरसेवक, उपाध्यक्ष, गटनेते यांच्यासह आणखी कोण कोण मैदानात उतरते, कोणती नवी भूमिका घेतली जाते आणि नगरपालिकेच्या कारभाराला नेमका कोणता धक्का बसतो — याकडे आता संपूर्ण गंगाखेड शहराचे लक्ष लागले आहे.
एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून ‘सर्व काही नियमाप्रमाणे’ असा दावा, तर दुसरीकडे यशवंत सेनेकडून ‘नियमांच्या आड लपवलेले व्यवहार’ असा थेट आरोप — या संघर्षातून उद्याची पत्रकार परिषद राजकीय स्फोटक ठरणार हे मात्र नक्की.
गंगाखेडच्या नगरकारभारातील सत्य बाहेर येणार का, की आणखी एक पडदा पडणार?
उत्तर उद्याच मिळेल.

Check Also

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या …