24/06/26
Breaking News

कळमनुरी मर्डर प्रकरणातील दोन फरार आरोपी जेरबंद वाशिम-अकोला महामार्गावर पाच तास नाकाबंदी

 हिंगोली | प्रतिनिधी
कळमनुरी शहरातील साईनगर परिसरात युवकाची दगडाने ठेचून हत्या झालेल्या खळबळजनक प्रकरणातील फरार दोन मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अखेर जेरबंद केले आहे. वाशिम-अकोला महामार्गावर तब्बल पाच तास नाकाबंदी करून ही धडक कारवाई करण्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 22 मे 2026 रोजी शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कळमनुरी येथील साईनगर परिसरातील खुल्या मैदानात एका युवकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी भेट देऊन तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात सुरुवातीला चार आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, गुन्ह्यातील दोन मुख्य आरोपी घटनेनंतर फरार झाले होते.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढत होते. तपासादरम्यान आरोपी वाशिम-अकोला महामार्गावरून प्रवास करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली.
या कारवाईत
आकाश विठ्ठल सातव (वय 28, रा. पाटील गल्ली, कळमनुरी)
भरत शंकरलाल यादव (वय 25, रा. साईनगर, कळमनुरी)
या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांना पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन कळमनुरी येथे हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, पोनि मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे, पोउपनि माधव जीवारे, पोलीस अमलदार गजानन पोकळे, सतीश जाधव, शिवाजी जाल्मिरे व हरिभाऊ गुंजकर यांच्या पथकाने केली.

Check Also

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या …