17/07/26
Breaking News

परीक्षा केंद्राबाहेर महिलांना दागीने काढावे लागले…नेमक काय घडलंं…

 राज्यभरात आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) पार पडत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना महिला परीक्षार्थींना थांबवण्यात आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सुरक्षेच्या नावाखाली महिलांना गळ्यातील मंगळसूत्र तसेच कान-नाकातील दागिने काढूनच परीक्षा केंद्रात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. या सूचनांमुळे अनेक महिलांची तारांबळ उडाली असून, परीक्षा केंद्रावर नेमकं काय घडलं याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं काय झालं?

आज सकाळी 9.30 ते दुपारी 12 या वेळेत ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, परीक्षार्थींना सकाळीच सात वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. रिपोर्टिंग टाईमपासूनच सुरक्षा तपासणी अत्यंत कडक करण्यात आली होती. परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर कुठलेही धातूचे साहित्य सोबत नेण्यास मनाई असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात येत होतं. या नियमांची अंमलबजावणी करताना अनेक ठिकाणी महिलांना गळ्यातील मंगळसूत्र, कानातील व नाकातील दागिने काढूनच परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यास सांगण्यात आलं. मंगळसूत्रसह कोणतेही दागिने घातलेले असतील, तर परीक्षा देऊ दिली जाणार नाही, अशी सूचना काही केंद्रांवर देण्यात आली. त्यामुळे अनेक महिला परीक्षार्थी गोंधळून गेल्या.

सकाळी सात वाजता रिपोर्टिंग टाईम असताना प्रत्येक परीक्षार्थीला परीक्षा केंद्रात जाताना कसून चौकशी केली जात होती. यात कुठलेही मेटलच साहित्य सोबत घेऊन जाऊ नका, असे गेटवरच सांगण्यात आले. महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र, काना नाकातले दागिने काढण्याचे सूचना केल्या, त्याशिवाय परीक्षेला जाता येणार नाही असं सांगितले. त्यामुळं मंगळसूत्रासह अंगावरची दागिने काढावे लागले.

सीटीईटी परीक्षेला जाताना महिलांची तारांबळ

छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. काही महिलांसोबत नातेवाईक उपस्थित असल्यामुळे त्यांनी दागिने नातेवाईकांकडे दिले. मात्र, ज्या महिला एकट्याच परीक्षा देण्यासाठी आल्या होत्या, त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली. काहींना दागिने कुठे ठेवावेत, याचा प्रश्न पडला, तर काही वेळेवर परीक्षा केंद्रात पोहोचू शकल्या नाहीत. या संपूर्ण प्रकारामुळे महिला परीक्षार्थींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तपासणी आवश्यक असली, तरी अशा सूचना आधीच स्पष्टपणे दिल्या गेल्या असत्या, तर हा गोंधळ टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया अनेक परीक्षार्थींनी दिली आहे. परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांना अशा अडचणींना सामोरं जावं लागणं योग्य नसल्याचं मतही व्यक्त होत आहे.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …