मराठा सामाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून आमरण उपोषण करत आहेत. तब्बल हजारो किलमोटीरचा प्रवास करून मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झालेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते, मराठा बांधव देखील हजर होते. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईचा नारा दिला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना मुंबई गाठा असे आवाहन दिले. या आवाहनानंतर मुंबईत हजारो गाड्यांच्या ताफ्यासह मराठे बांधव मुंबईत धडकले जिकडे नजर जाईल तिकडे फक्त मराठे.. मराठे आणि भगवं वादळ सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे.
रेल्वे स्थानके,समुद्र किनारे जाम
मराठा आरक्षणासाठी आज मुंबईत तुफान गर्दी उसळली असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात मराठा बांधवांचा जनसागर उसळला आहे. लाखोंच्या संख्येने आलेल्या मराठा समाजबांधवांच्या घोषणाबाजीने मुंबई दुमदुमली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुंबई गाठली असून जयघोष आणि आक्रमक उत्साहाने वातावरण भारावून गेल्याचे पाहायला मिळत आहे. जरांगे पाटील हे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीवर ठाम असून आझाद मैदानावर त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. संपूर्ण राज्यभरातून मराठा बांधव मुंबईकडे जमा झाले असून मंत्रालय परिसरात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. या आंदोलनामुळे एकप्रकारे ‘भगव वादळ’ मुंबईत धडकले आहे.
Shabdraj www.shabdraj.com