आजच्या बदलत्या जीवनशैलीत आणि वातावरणात त्वचेची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. स्किन केअर करताना नैसर्गिक घटकांचा वापर करणे नेहमीच फायदेशीर ठरते, कारण तज्ज्ञांच्या मते अशा गोष्टींना दुष्परिणाम नसतात. कोरफड, हळद, मध, नारळाचे तेल, गुलाबपाणी यांसारखे नैसर्गिक उपाय त्वचेला आतून पोषण देतात. प्रत्येक घटकाचे वेगळे गुणधर्म असतात आणि ते त्वचेवर लावल्याने अनेक प्रकारचे फायदे होतात. त्यामुळे त्वचा नैसर्गिकरीत्या निरोगी आणि तेजस्वी दिसते. मॉइश्चरायझिंगपासून ते स्क्रबिंगपर्यंत, त्वचेच्या प्रत्येक गरजेसाठी नैसर्गिक उपाय सहज उपलब्ध आहेत.
कोरड्या त्वचेपासून ते तेलकट त्वचेपर्यंत प्रत्येक प्रकारच्या त्वचेच्या गरजा वेगवेगळ्या असतात. कोरड्या त्वचेला ज्याप्रमाणे ओलावा हवा असतो, त्याचप्रमाणे तेलकट त्वचेपासून मुक्ती मिळावी यासाठी त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकणे. म्हणून तुम्ही तुमच्या त्वचेवर काय लावायचे हे ठरवण्यापूर्वी तुमची स्किन टोन लक्षात ठेवा.
१. ज्यांची त्वचा ना खूप तेलकट असते ना खूप कोरडी, त्यांची स्किन टोन सामान्य प्रकारात मोडते. अशा त्वचेची देखभाल करणे तुलनेने सोपे असते. नैसर्गिक तेज आणण्यासाठी मधात थोडी हळद आणि कच्चे दूध मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावून 20 मिनिटे ठेवावा आणि नंतर स्वच्छ धुवून घ्यावा. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि चेहरा ताजातवाना दिसतो.
२. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर ती मऊ करण्यासाठी ताज्या दुधाची मलई घ्या आणि त्यात दोन ते तीन बारीक वाटलेले बदाम मिसळून पेस्ट तयार करा. बदाम हे व्हिटॅमिन ईचे उत्तम स्रोत असल्यामुळे ते त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. या मिश्रणात चिमूटभर हळद घाला आणि तयार पॅक चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे लावा. नंतर चेहरा स्वच्छ धुवून मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा अधिक मऊ, गुळगुळीत आणि पोषक दिसेल.
३. जर फेसवॉश केल्यानंतर लगेचच चेहऱ्यावर तेल येऊ लागले, तर ती त्वचा तेलकट समजली जाते. अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी मुलतानी माती, चंदन पावडर, कडुलिंबाच्या पानांची पावडर, चिमूटभर हळद आणि गुलाबपाणी एकत्र करून फेसपॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्यावर लावून 20 मिनिटे ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेवरील जास्तीचे तेल कमी होईल आणि मुरुमांची समस्या हळूहळू कमी होण्यास मदत होईल.
४. ज्या लोकांच्या चेहऱ्याच्या काही भागांवर, जसे टी-झोन किंवा गालाभोवती, तेलकटपणा दिसतो आणि उर्वरित त्वचा कोरडी राहते, त्यांना मिश्र त्वचा प्रकार म्हटले जाते. अशा त्वचेसाठी काकडीचा रस घेऊन त्यात दही, मध आणि चिमूटभर हळद मिसळून फेसपॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा.
(महत्वाची सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय हे सर्वसाधारण ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला कोणताही दुजोरा नाही. कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
Shabdraj www.shabdraj.com