राष्ट्रवादीच्या घड्याळाचे बटण दाबताच भाजपाच्या कमळाला मतदान होत असल्याच्या आरोपांमुळे पुणे शहरात मोठा गोधळ निर्माण झाला… मार्करची शाई मिटवून अनेक ठिकाणी दुबार मतदान केले जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला…
पुणे महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना एक अजब प्रकार समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबल्यानंतर भाजपाच्या कमळाला मतदान होत असल्याचा आरोप एका मतदाराने केला. प्रभाग क्रमांक २५ ड येथील शिवाजी मराठा हायस्कूलमधील मतदान केंद्रावर घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने सदरील मतदान केंद्रावर धाव घेतली. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारतानाचा त्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. उमेदवाराने मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यानंतर प्रभागातील ३६० मतदान राखीव ठेवण्याचा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
ठाकरेंचा निवडणूक आयोगावर संताप
महापालिका निवडणुकांच्या मतदानावेळी राज्यातील अनेक मतदान केंद्रावर दुबार मतदान केले जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. मार्करची शाई मिटवून अनेक ठिकाणी दुबार मतदान केले जात असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. यावेळी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी संताप व्यक्त केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही माध्यमांशी संवाद साधताना मतदारांच्या बोटाला लावण्यात येणाऱ्या मार्करच्या शाईवर आक्षेप घेतला. यंदा महापालिका निवडणूक मतदान प्रक्रियेत शाईऐवजी मार्कर पेनचा वापर करून मतदारांच्या बोटाला शाई लावली जात आहे. परंतु, मार्करची शाई नेल पॉलिश रिमूव्हर, सॅनिटायझर आणि इतर काही लिक्विडने पुसली जात असल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे. दुसरीकडे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. निकालानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी विरोधक करत असल्याचे टोला त्यांनी लगावला आहे.
Shabdraj www.shabdraj.com