राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. बुधवारी सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजितदादा आपली सर्व कामे उरकून सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबईतून निघाले. बारामतीत लँडिंगवेळी, 8 वाजून 46 मिनिटांनी त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामुळे अवघा महाराष्ट्र सुन्न झाल्याचं दिसून येतंय.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होत्या. या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते. मुंबईहून बारामतीसाठी सकाळी विमान निघालं होतं. यादरम्यान लँडिंगदरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. विमानाचा अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचा मृत्यू झाला.
: खोलगट भागात विमान कोसळलं
अजित पवारांच्या विमानाचा अपघात बारामती एअरपोर्ट पासून दोन ते तिन किलोमीटर अंतरावर झाला. विमानात ऐनवेळी झालेल्या बिघाडामुळे विमान धावपट्टीवर लँड होऊ शकले नाही. एअरपोर्ट पासून पुढे दोन ते तिन किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावरील जमिनीवर जाऊन हे विमान कोसळले.
जिथे हे विमान कोसळले तिथे खोलगट भाग आहे. आजुबाजुला झाडं झूडपं आणि उस शेती आहे. शेजारी काही घरांची वस्ती आहे. या विमानाचा जळून कोळसा झाला. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे विमानातील कागदपत्रं सहिसलामत राहिलीत. कदाचित विमान जमिनीवर कोसळल्यानंतर विमानाचे दोन तूकडे झाले आणि कागदपत्रं बाहेर फेकली गेली.
अपघात नेमका कसा झाला?
1. सकाळी 8.10 मिनिटं
मुंबईतून लियरजेट 45 XR विमानाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीकडे उड्डाण झालं. त्यामध्ये अजितदादांसह पाच जणांचा समावेश होता.
2. सकाळी 8.40 मिनिटं
विमान बारामती एअरस्ट्रीपच्या अगदी जवळ होतं, त्यावेळी विमानात काही तांत्रिक बिघाड झाला.
3. सकाळी 8.46 मिनिटं
तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि बारामतीतील गोजुबावी परिसरातील शेतात विमान कोसळलं. त्यामध्ये अजित पवारांसह सर्व जणांचा मृत्यू झाला.
: विमान अपघाताचा घटनाक्रम
- पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.
- बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे ILS (Instrument Landing System) सुविधा नाही.
- त्यामुळे पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.
- विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.
- याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (aborted) केला गेला.
- धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले.
- दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला.
- याचवेळी पायलटने MAYDAY कॉल जारी केला.
- DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.
- लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले.
- सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला.
- रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले.
- विमान जमीनीवर आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले.
- त्यानंतर विमानात भीषण आग लागली.
- आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही.
- अपघाताचा तपास चालू आहे, DGCA अहवालानंतर अंतिम कारण निश्चित होईल.
: विमानात कोण कोण होते?
- अजित पवार
- विदीप जाधव
- पिंकी माळी
- कॅप्टन सुमित कपूर
- कॅप्टन शांभवी पाठक
: घड्याळामुळे ओळख पटली
अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कारणीभूत ठरलं ते त्यांच्या मनगटावरचं घड्याळ. राजकीय क्षेत्राचा विचार केला तर घड्याळ हेच चिन्ह घेऊन राष्ट्रवादीचा पर्यायाने अजित पवारांचा प्रवास, त्यांची राजकीय कारकीर्द चढत्या क्रमाने पुढे जात राहिली. पुढे राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाल्यानंतरही घड्याळ हे चिन्ह त्यांच्याकडेच राहिलं आणि आज मनगटावरच्या घड्याळाने त्यांच्या मृतदेहाची शेवटची ओळख पटणं, हा नियतीचा क्रूर खेळ म्हणावा की आणखी काही हेच कळत नाही.
Shabdraj www.shabdraj.com