24/03/26
Breaking News

युध्दाचा परिणाम, पेट्रोल-डिझेल महागणार?

आखाती देशांमधील वाढत्या तणावादरम्यान सोमवारी खनिज तेलाच्या किमती ५०४ रुपयांनी वाढून ६,५९६ रुपये प्रति बॅरल या उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) , एप्रिल डिलिव्हरीसाठी खनिज तेलाचा भाव ५०४ रुपयांनी किंवा ८.२७ टक्क्यांनी वाढून ६,५९६ रुपये प्रति बॅरलवर पोहोचला.

इराण आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीत वाढलेल्यया तणावाचा फटका तेलाच्या वाहतुकीला बसणार आहे. सध्या भारतीय तेलशुद्धीकरण कंपन्यांकडे किमान १० दिवस पुरेल इतके कच्चे तेल असून आणखी ५ ते ७ दिवस पुरेल इतका इंधन साठा आहे. त्यामुळे भारताला तातडीने तेलाची टंचाई जाणवण्याची शक्यता नाही, पण नजीकच्या काळात कच्च्या तेलाचे दर वाढण्याची आणि त्याचा अर्थकारणावर व्यापक परिणाम होण्याची भीती आहे. मात्र याचा परिणाम येत्या काही महिन्यात पेट्रोल-डिझेलवर दिसण्याची शक्यता आहे.

आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे फ्युचर्स बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढल्या, असे विश्लेषकांनी सांगितले. जागतिक स्तरावर, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड ५.५५ टक्क्यांनी वाढून ७०.७४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला, तर न्यू यॉर्कमध्ये ब्रेंट क्रूड ५.८६ टक्क्यांनी वाढून ७७.१४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला.

इराक, सौदी अरेबिया, यूएई आणि कुवेत येथून आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाची वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून केली जाते. या मार्गाने जगातील २० टक्के द्रव पेट्रोलियम पदार्थ आणि एलएनजीची वाहतूक होते. दररोज हे प्रमाण सुमार २५ ते २७ लाख पिंपे इतके आहे. हे प्रमाण भारताच्या एकूण आयातीच्या जवळपास निम्मे आहे.

पश्चिम आशियातील घडामोडींमुळे भू-राजकीय अस्थिरता वाढल्यामुळे भारतासमोर इराणव्यतिरिक्त अमेरिका, पश्चिम आशियातील अन्य देश, दक्षिण अमेरिका आणि प्रसंगी रशियाकडूनही तेल विकत घेण्याचा पर्याय आहे. पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. देशातील इंधनाचे दर हे आंतरराष्ट्रीय दराशी संलग्न करण्यात आले आहेत. यामुळे येत्या काळात इंधनाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

Check Also

आता ईमेल पत्ता बदलता येणार..नविन फीचर होणार लॉन्च

जगातील सर्वात लोकप्रिय ईमेल प्लॅटफॉर्म जीमेल (Gmail) च्या कोट्यवधी वापरकर्त्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. …