राज्यभरातील १६ अधीक्षक अभियंत्यांच्या तडकाफडकी बदल्या; प्रशासकीय सर्जरीमागे नेमकं काय?
पुर्णा / प्रतिनिधी (सुशिल दळवी) – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अर्थात महावितरण मध्ये मोठा प्रशासकीय भूकंप झाला असून राज्यभरातील तब्बल १६ अधीक्षक अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश तात्काळ प्रभावाने जारी करण्यात आले आहेत. या अचानक झालेल्या फेरबदलामुळे महावितरणच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महावितरण व्यवस्थापनाने “प्रशासकीय कारणास्तव” या बदल्या करण्यात आल्याचे स्पष्ट केले असले, तरी या मोठ्या हालचालीमागे कामकाजातील शिस्त, प्रलंबित प्रकल्प, वीज चोरी नियंत्रण, तक्रारींचा वाढता आकडा आणि विभागीय कार्यक्षमतेचा प्रश्न असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘ऑपरेशन ट्रान्सफर’मागे काय संकेत?
राज्यात अनेक ठिकाणी वीज वितरणातील अनियमितता, पायाभूत सुविधांतील विलंब, वाढती थकबाकी, तांत्रिक बिघाड तसेच ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींमुळे महावितरणवर दबाव वाढला होता. अशा पार्श्वभूमीवर अचानक करण्यात आलेल्या या बदल्यांकडे “प्रशासकीय सर्जरी” म्हणून पाहिले जात आहे.
विशेष म्हणजे, बदल्यांसोबत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या ताब्यातील लॅपटॉप, सिम कार्ड, मोबाईल हँडसेट, प्रिंटरसह सर्व आयटी साहित्य तात्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या कारवाईत पारदर्शकता आणि संवेदनशील माहितीच्या सुरक्षिततेलाही महत्त्व दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोणाची कुठे बदली?
या मोठ्या फेरबदलात संजय सुदामराव खंदारे यांची वसई विभागातून नांदेड विभागात बदली करण्यात आली आहे. अनिल तनबाजी काळे यांना लातूरमधून अमरावती विभाग (इन्फ्रा) येथे पाठवण्यात आले आहे.
संदीप दत्तात्रेय दरवडे यांच्याकडे वाशिम विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, राजपुत्र जगन्नाथ जरगा हे आता जालना विभागाचा कार्यभार सांभाळतील. महिला अधिकारी संध्या भाऊराव चिवंडे यांची पुणे ग्रामीणमधून गोंदिया येथे बदली झाली आहे.
याशिवाय मंगेश श्यामराव वैद्य, संजय प्रभाकर सारग, रामराव धनसिंग राठोड, सुरेंद्र गिरजप्पा कटके, दिपाली धनंजय मदेलवार, अजय उत्तमराव शिंदे, रमेशकुमार सीताराम पवार, अनिल मधुकर वाकोडे, रुपेश कैलाश टेंभूर्णे आणि प्रवीण मारोतराव दारोली यांनाही नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
कार्यमुक्तीचे तातडीचे आदेश
महावितरण व्यवस्थापनाने सर्व विभागीय कार्यालयांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करून पर्यायी स्थानिक व्यवस्था करावी. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना नियमानुसार बदली भत्ता आणि रुजू होण्यासाठी आवश्यक कालावधी देखील देण्यात येणार आहे.
कर्मचारी वर्तुळात चर्चांना उधाण
या मोठ्या बदल्यांनंतर महावितरणच्या कर्मचारी वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. काही ठिकाणी आगामी चौकशा, काही विभागांतील कामकाजावरील नाराजी, तर काही ठिकाणी राजकीय व प्रशासकीय दबावामुळे हे फेरबदल झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, अधिकृत स्तरावर याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
पुढील टप्प्यात आणखी बदल्यांची शक्यता?
महावितरणमध्ये सुरू झालेल्या या “ऑपरेशन ट्रान्सफर”चा हा फक्त पहिला टप्पा असल्याची चर्चा असून, आगामी काळात कार्यकारी अभियंते आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील वीज व्यवस्थापन अधिक सक्षम आणि उत्तरदायी करण्यासाठी महावितरण प्रशासन आता अधिक आक्रमक भूमिका घेत असल्याचे संकेत या निर्णयातून मिळत आहेत.
Shabdraj www.shabdraj.com