परभणी / प्रतिनिधी – परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात मोटारसायकल नावावर करून देण्याच्या कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्या दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी (दि. ३ जुलै) यशस्वी सापळा रचून रंगेहात पकडले. या कारवाईमुळे आरटीओ कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २८ वर्षीय तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये खरेदी केलेली मोटारसायकल स्वतःच्या नावावर करण्यासाठी आवश्यक ऑनलाइन शुल्क भरल्यानंतरही काम पूर्ण करण्यासाठी लाचेची मागणी होत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते.
तक्रारीनुसार, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, आसोला येथील कनिष्ठ लिपिक-टंकलेखक मीरा नारायणराव लोकरे (वय ३७) यांनी सुरुवातीला १,००० रुपयांची मागणी केली. पडताळणीदरम्यान तडजोडीनंतर ही रक्कम ८०० रुपयांवर निश्चित करण्यात आली. तसेच लिपिक सय्यद जफर सय्यद अकबर (वय ५३) यांनी मोटारसायकलवर कोणताही दंड प्रलंबित नसल्याची नोंद करून आवश्यक शिक्का व सही करण्यासाठी ५०० रुपयांची लाच मागितल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ जुलै रोजी सापळा रचला. पंचांसमक्ष मीरा लोकरे यांनी तक्रारदाराकडून ८०० रुपये, तर सय्यद जफर यांनी ५०० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले.
या प्रकरणी आरोपींच्या मोबाईलची तपासणी करण्यात येत असून आवश्यकतेनुसार जप्तीची प्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच आरोपींच्या घरांची झडती घेण्याची कार्यवाही सुरू आहे.
या प्रकरणात ताडकळस पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईचे पर्यवेक्षण व तपास पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर करीत आहेत.
Shabdraj www.shabdraj.com