परभणी, दि. ९ : परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत आज (९ जुलै) पहाटे एका पाठोपाठ एक असे भूकंपाचे चार सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या भूकंपांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
पहाटे १:३७ वाजता भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्याची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. त्यानंतर २:१५ वाजता ३.६ रिश्टर स्केल, २:१७ वाजता ३.९ रिश्टर स्केल आणि ३:२३ वाजता ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे आणखी तीन सौम्य धक्के जाणवले. अवघ्या दोन तासांपेक्षा कमी कालावधीत सलग चार धक्के बसल्याने अनेक नागरिक घराबाहेर पडले.

भूकंपाचे धक्के परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील विविध भागांत जाणवले. पहिल्या धक्क्याचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे गावाच्या दक्षिणेस असून त्याची खोली १० किलोमीटर नोंदविण्यात आली. त्यानंतरच्या धक्क्यांचे केंद्र पांग्रा शिंदे गावाच्या पश्चिम-उत्तरेस असलेल्या काकडधाबा परिसरात होते. या धक्क्यांची खोलीही १० किलोमीटर इतकी नोंदविण्यात आली.
यापूर्वी ११ एप्रिल २०२६ रोजी या परिसरात ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यानंतर पुन्हा या भागात भूकंपाची मालिका जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही माहिती ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ तथा छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास एस. औंधकर यांनी दिली.
मराठवाड्यातील काही भागांत यापूर्वीही सौम्य भूकंपीय हालचालींची नोंद झाली आहे. मात्र, मध्यरात्रीनंतर अल्प कालावधीत वारंवार जाणवलेल्या धक्क्यांमुळे हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. भूकंपाची नेमकी केंद्रबिंदूची माहिती, खोली, प्रत्येक धक्क्याची स्वतंत्र तीव्रता आणि त्याचा परिसरावर झालेला परिणाम याबाबत अधिकृत यंत्रणांकडून सविस्तर माहिती अपेक्षित आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी संयम राखावा आणि कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Shabdraj www.shabdraj.com