06/08/26
Breaking News

नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये हनिमूनसाठी सजवला First AC कोच; व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वेची मोठी कारवाई

First AC coach of Nandigram Express decorated for a honeymoon

First AC coach of Nandigram Express decorated for a honeymoon

परभणी – नंदीग्राम एक्स्प्रेसमधील हनिमून सजावट प्रकरणामुळे रेल्वे प्रशासनाला मोठी कारवाई करावी लागली आहे. मुंबई–बल्लारशाह दरम्यान धावणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसच्या First AC कोचमध्ये नवविवाहित जोडप्यासाठी फुले, फुगे आणि सजावटीच्या साहित्याने केबिन सजवण्यात आली होती. या सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली.

 

तपासात रेल्वेच्या सुरक्षा आणि प्रवेशासंबंधी नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आल्यानंतर नांदेड विभागातील Chief Ticket Inspector (CTI) गिरीश कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, रेल्वेच्या परवानगीशिवाय डब्यात प्रवेश करून सजावट करणाऱ्या संबंधित डेकोरेटरविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?
प्राथमिक माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 11002 बल्लारशाह–मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेसच्या First AC कोचमधील बर्थ क्रमांक 19 आणि 20 नवविवाहित जोडप्यासाठी सजवण्यात आले होते. ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून जालन्यातील एका डेकोरेशन व्यावसायिकाने ही सजावट केल्याचे तपासात समोर आले आहे.

 

व्हायरल व्हिडिओमध्ये एखाद्या आलिशान हॉटेलप्रमाणे संपूर्ण केबिन गुलाबाची फुले, रंगीबेरंगी फुगे आणि सजावटीच्या वस्तूंनी आकर्षक पद्धतीने सजवलेली दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला.

 

 

रेल्वेची कठोर भूमिका
या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली. तपासादरम्यान संबंधित डेकोरेटरला रेल्वेच्या अधिकृत परवानगीशिवाय फर्स्ट एसी डब्यात प्रवेश मिळाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

 

 

दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी ए. श्रीधर यांनी सांगितले की, जालना स्थानकावर सजावट करणाऱ्या व्यक्तीचा डब्यातील प्रवेश पूर्णपणे अनधिकृत होता. रेल्वेच्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या प्रकाराकडे अत्यंत गंभीरतेने पाहिले जात असून, संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.

 

 

रेल्वे प्रशासन आता या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता, परवानगी कशी मिळाली आणि सुरक्षा नियमांमध्ये नेमकी कुठे त्रुटी राहिली याचीही चौकशी करत आहे.

Check Also

अभिजित दिपकेंचा पोलिसांना इशारा तर… आंदोलकांना संयम राखण्याचे आवाहन

Sonam Wangchuk नवी दिल्ली – कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी आंदोलकांवर झालेल्या लाठीमारप्रकरणी …