18/07/26
Breaking News

अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर छापा

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार असलेल्या नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर पुणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. डिझाईन बॉक्स असं या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी अजित पवार यांच्यासाठी काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मनपा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा आज ५ वाजता थंडावल्या आहेत. त्यानंतर लगेच ही कारवाई करण्यात आल्याने पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्राईम ब्रॉन्चचे अधिकारी डिझाईन बॉक्सच्या कार्यालयात आहेत. त्याठिकाणी ते कागदपत्रांची तपासणी करत असल्याचं सांगण्यात आहे. मात्र, ही कारवाई नेमकी का करण्यात आली? याबाबत अद्याप माहिती पुढे आलेली नाही. यासंदर्भात कंपनीचे सर्वेसर्वा नरेश अरोला लवकरच माध्यमांशी संवाद साधणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ऐन निवडणुकच्या दोन दिवस आधी ही कारवाई करण्यात आल्याने विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत.

यंदाच्या मनपा निवडणुकीत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यात खरी लढत बघायला मिळणार आहे. निवडणुकीच्या प्रचारातही दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका टिप्पणी केल्याचं बघायला मिळालं. अजित पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या कारवाईमागे कुणाचे कारस्थान आहे का, यामागचा मास्टरमाइंड कोण हे आम्ही १६ तारखेनंतर सांगू. पोलिसांनी त्यांची कारवाई केली त्यात हरकत नाही. कर नाही त्याला डर कशाला? ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांनी असं कुभांड केलंय का? त्याचे उत्तर १७ तारखेला देऊ. ही कारवाई वरून साधी सोपी वाटत असली तरी त्यामागे राजकीय किनार असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ते म्हणाले. या कारवाईनंतर आता दोन्ही पक्षातील आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे.

Check Also

लोहगडावर नेमक काय घडलं…मयत केतनच्या भावी पत्नीचे कारनामे समोर

लोहगड किल्ल्यावर २६ वर्षीय केतनला दरीत ढकलून त्याची हत्या केल्याप्रकरणी एक अत्यंत खळबळजनक आणि अंगावर …