26/08/26
Breaking News

नांदेडमध्ये पत्त्यासारखा कोसळला उड्डाणपुलाचा भाग

शहराजवळील अत्यंत वर्दळीच्या नांदेड-लातूर महामार्गावर दोन दिवसांपूर्वी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली. विष्णुपूरी येथे उड्डाणपुलाचा बाजूचा खालचा भाग अचानक पत्त्यासारखा कोसळला. या दुर्दैवी घटनेत दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. या रस्त्याचे काम अद्याप प्रगतीपथावर असतानाच पूल कोसळल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदाराच्या कामाच्या दर्जावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाविद्यालयासमोरच घडला थरार; २ विद्यार्थिनी जखमी

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सकाळी कॉलेज सुटण्याच्या किंवा भरण्याच्या वेळेत घडली. विष्णुपूरी हा परिसर शैक्षणिक हब म्हणून ओळखला जातो. उड्डाणपुलाचा महाकाय भाग अचानक खाली कोसळल्याने तेथून जाणाऱ्या दोन विद्यार्थिनी ढिगाऱ्याच्या कचाट्यात आल्या आणि जखमी झाल्या. त्यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पूल कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने आणि ढिगाऱ्याचे साम्राज्य पसरल्याने परिसरात काही काळ एकच धावपळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अत्यंत वर्दळीचा रस्ता, मोठा अनर्थ टळला!

विष्णुपूरी हा भाग नांदेडमधील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता मानला जातो. याच परिसरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि अनेक नामांकित अभियांत्रिकी व शैक्षणिक संस्था आहेत. महामार्ग असल्याने या ठिकाणी दिवस-रात्र वाहनांची आणि विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. सुदैवाने पूलाचा भाग कोसळला तेव्हा त्याखाली कोणतीही मोठी गाडी किंवा लोकांचा घोळका नव्हता, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.

Check Also

टोलेजंग इमारत सज्ज, तरी वाचक प्रतीक्षेत! हिंगोलीतील नवीन जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन कधी?

​हिंगोली (विशेष प्रतिनिधी): हिंगोली शहरातील महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्हा ग्रंथालयाची भव्य आणि …