12/06/26
Breaking News

हिंगोलीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करा; आ.मुटकूळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 हिंगोली (प्रतिनिधी)
जिल्ह्याचा शैक्षणिक विकास वेगाने व्हावा आणि स्थानिक विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण मिळावे, यासाठी हिंगोलीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी आमदार तान्हाजीराव मुटकूळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील आणि परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता व गुणवत्ता आहे. मात्र, स्थानिक पातळीवर उच्च व तंत्रशिक्षणाच्या पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत.परिणामी, येथील गरीब, शेतकरी, कष्टकरी व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे आणि मुंबई यांसारख्या दूरच्या व मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. मोठ्या शहरांमधील महागडे शिक्षण आणि राहण्याचा मोठा खर्च सामान्य पालकांच्या आवाक्याबाहेर आहे. आर्थिक परिस्थिती अभावी अनेक हुशार व होतकरू विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
हिंगोली येथे हक्काचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाल्यास, या भागातील हजारो विद्यार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळेल. विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणावर कमी होईल. स्थानिक पातळीवरच दर्जेदार व नामांकित तांत्रिक शिक्षण मिळाल्यामुळे या संपूर्ण परिसराच्या शैक्षणिक, औद्योगिक आणि आर्थिक विकासाला एक नवी दिशा व गती मिळेल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य आणि या मागास भागाचा सर्वांगीण विकास विचारात घेता,हिंगोली येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी द्यावी,अशी मागणी आमदार तान्हाजीराव मुटकूळे यांनी केली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.

Check Also

खडकपुरा गल्लीत गोदामावर धाड,92 हजार 248 रुपयांचा मुद्देमाल जप्त

गंगाखेड,दि 12  गंगाखेड शहरातील खडकपुरा गल्लीत दि १० जुनच्या मध्यरात्री अवैध गुटखा साठ्यावर स्थानिक गुन्हे …