27/03/26
Breaking News

लाडक्या बहिणींना दिलासा, फेब्रुवारीचा हप्ता लवकरच खात्यात

राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले होते. अखेर या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सामाजिक न्याय विभागाने यासाठी 277 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

महिला व बालविकास विभागामार्फत राबवली जाणारी ही योजना राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची ठरली आहे. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट खात्यात जमा केले जातात. जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात आला होता. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार, याची उत्सुकता महिलांमध्ये होती. आता निधी वितरणाला मंजुरी मिळाल्यामुळे येत्या काही दिवसांत हा हप्ता जमा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या योजनेतील पात्रता टिकवून ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनेक महिलांकडून अर्ज करताना काही तांत्रिक चुका झाल्याचे निदर्शनास आले होते. चुकीचे पर्याय निवडल्यामुळे काही जणी अपात्र ठरण्याच्या मार्गावर होत्या. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने 31 मार्चपर्यंत ई-केवायसी दुरुस्तीची मुदत दिली आहे. त्यामुळे महिलांनी वेळेत आपली माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे.

ई-केवायसी मोबाईल किंवा संगणकाद्वारे पूर्ण करता येते. मात्र, अजूनही काही महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यातील हप्ता थांबण्याची शक्यता आहे. सध्या या दुरुस्तीसाठी केवळ काही दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे संबंधित महिलांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

माहिती योग्यरित्या अपडेट करणे गरजेचे

विशेष म्हणजे, ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. ज्या महिलांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांना योजनेचा लाभ मिळणे थांबले आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या मुदतीचा लाभ घेत, सर्व पात्र महिलांनी आपली कागदपत्रे आणि माहिती योग्यरित्या अपडेट करणे गरजेचे आहे. यामुळेच फेब्रुवारीसह पुढील हप्तेही नियमितपणे मिळू शकतील.

Check Also

शेतरस्ता अडवला तर आधार कार्ड ब्लॉक, सरकारी योजनाही बंद

राज्यातील शेतकरी आणि त्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी बारमाही रस्ते असावेच लागतात, ती काळाची गरज आहे. पण …