मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पक्षाच्या सहा खासदारांना पाठवलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. या पत्रात, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कोणत्याही राजकीय पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहा खासदारांच्या विलीनीकरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
१३ जुलै २०२६ रोजी संसदीय पक्षाच्या वतीने अरविंद सावंत यांच्या स्वाक्षरीने हे पत्र संबंधित खासदारांना पाठवण्यात आले. या पत्रात सहा महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार, संबंधित खासदार हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या मूळ राजकीय पक्षाच्या ‘मशाल’ चिन्हावर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले असून, पक्षानेच त्यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढवून विजय मिळवला होता.

पत्रात पुढे म्हटले आहे की, काही सार्वजनिक चर्चांमधून आणि माध्यमांतील वृत्तांमधून संबंधित खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर येत आहे. तसेच या विलीनीकरणाला मान्यता मिळावी यासाठी लोकसभा अध्यक्षांकडेही प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने याबाबत स्पष्ट भूमिका मांडत, पक्षाने कोणत्याही राजकीय पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतलेला नाही, तसेच अशा कोणत्याही विलीनीकरणाला पक्षाची मान्यता किंवा परवानगी दिलेली नसल्याचे नमूद केले आहे.
पत्रात संविधानाच्या दहाव्या अनुसूचीतील परिच्छेद ४ चा उल्लेख करत सांगण्यात आले आहे की, मूळ राजकीय पक्षाचे विलीनीकरण झाल्याशिवाय संसदीय पक्षाच्या विलीनीकरणाला कायदेशीर मान्यता मिळू शकत नाही. त्यामुळे केवळ संसदीय पक्षाने घेतलेल्या निर्णयाच्या आधारे विलीनीकरण वैध ठरत नाही.
या पार्श्वभूमीवर, लोकसभा अध्यक्षांनी अद्याप सहा खासदारांच्या विलीनीकरणाला अधिकृत मान्यता दिलेली नसल्याचेही या पत्रातून सूचित होत असल्याची चर्चा आहे. जर अशा विलीनीकरणाला वैधानिक मान्यता मिळाली नाही, तर संबंधित खासदारांच्या पक्षांतरावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. तसेच त्यांच्याविरोधात दहाव्या अनुसूचीनुसार अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
Shabdraj www.shabdraj.com