14/07/26
Breaking News

कचरा व्यवस्थापन क्षेत्रात व्यवसाय सुरू करायचा? ‘अमृत-सक्षम’ उपक्रमात करा नोंदणी

Waste Management Business Maharashtra

परभणी – महाराष्ट्रात कचरा व्यवस्थापन हे केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता, वेगाने विकसित होत असलेले हरित उद्योग क्षेत्र बनत आहे. वाढते शहरीकरण, पर्यावरणीय नियम आणि पुनर्वापर याविषयी वाढलेली जागरूकता यामुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘अमृत’ आणि ‘कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत-सक्षम’ हा उद्योजकता विकास उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे.

 

 

या उपक्रमाच्या माध्यमातून युवक-युवती, महिला, स्वयंरोजगाराची इच्छा असलेले नागरिक, स्वयंसेवी संस्था तसेच विद्यमान उद्योजकांना कचरा व्यवस्थापन क्षेत्रात शाश्वत व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

 

 

कचरा ही समस्या नसून उत्पन्नाचा प्रभावी स्रोत ठरू शकतो. सुकलेल्या फुलांपासून अगरबत्ती व धूपनिर्मिती, प्लास्टिक, कागद आणि काचेचे पुनर्वापर उद्योग तसेच रिसोर्स रिकव्हरी सेंटर उभारणीसारख्या व्यवसायांद्वारे नियमित उत्पन्न मिळविण्याच्या संधी उपलब्ध आहेत. योग्य तांत्रिक ज्ञान, आर्थिक नियोजन आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास या क्षेत्रात यशस्वी उद्योग उभारणे शक्य असल्याचे उपक्रमाच्या आयोजकांनी सांगितले.

 

 

‘अमृत-सक्षम’ अंतर्गत इच्छुकांना व्यवसायाची निवड, आर्थिक नियोजन, बँक कर्ज प्रक्रिया, शासकीय योजना व अनुदानाचा लाभ, उत्पादनाची विक्री आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यापर्यंत टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि अमृतच्या विविध योजनांद्वारे पात्र उमेदवारांना उद्योग उभारणीसाठी विशेष सहाय्य मिळणार आहे.

 

 

या उपक्रमासाठी कोणत्याही पूर्वानुभवाची आवश्यकता नसून स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती, महिला बचत गट, विद्यमान उद्योजक, निवृत्त अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिक अर्ज करू शकतात. अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांना विविध योजनांचा लाभही उपलब्ध होणार आहे.

 

 

इच्छुकांनी ऑनलाइन नोंदणी करून अर्ज भरावा. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ‘अमृत-सक्षम’ची टीम संबंधित उमेदवारांशी संपर्क साधून त्यांच्या जिल्ह्यातील कार्यशाळेची माहिती देणार आहे. यासंदर्भात प्राथमिक माहिती देण्यासाठी १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता AMRUT YouTube चॅनेलवर लाईव्ह सत्र आयोजित करण्यात आले असून इच्छुकांनी त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

अधिक माहितीसाठी ७७५७०९१८५९ किंवा ७३९१०६५४७३ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. तसेच संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयातही माहिती उपलब्ध आहे. दरम्यान, संधीची वाट न हरित क्रांतीचा भाग होण्याचे आवाहन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.

Check Also

‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी शाळा, फीस ऐकून व्हाल थक्क…

इन्स्टिट्यूट ले रोझी ही स्वित्झर्लंडमधील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि जगातील सर्वात महागड्या बोर्डिंग शाळांपैकी एक …