विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision) २०२६
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
प्रश्न १: विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) म्हणजे काय व ते राबविण्याचा उद्देश काय आहे?
उत्तर: राज्यातील विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या दोषविरहित व अद्ययावत करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण होय. सन २००२-२००४ या कालावधीत देशात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण करण्यात आले होते. त्यानंतर वाढते शहरीकरण, नागरिकांचे स्थलांतर, मतदारांचे मृत्यू, दुबार नावे इत्यादी कारणांमुळे मतदार याद्या अद्ययावत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्ण देशामध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

प्रश्न २: हा कार्यक्रम कधी राबविला जाणार आहे?
उत्तर: हा कार्यक्रम महाराष्ट्रात दि. ३० जून, २०२६ ते ०७ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत निवडणूक आयोगाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officer) दिनांक ३०.०६.२०२६ ते २९.०७.२०२६ या कालावधीत मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना प्रपत्र (Enumeration Form) भरणार आहेत. त्यानंतर दि. ५ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर, २०२६ या कालावधीत सदर याद्यांच्या अनुषंगाने दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. दि. ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत नोटिसा देणे व त्याबाबतची कार्यवाही तसेच प्राप्त दावे व हरकतींच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल व दि. ७ ऑक्टोबर, २०२६ रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.
प्रश्न ३: गणना प्रपत्रामध्ये कोणती माहिती भरावयाची आहे?
उत्तर: गणना प्रपत्रामध्ये मतदाराची सध्याच्या मतदार यादीतील माहिती पहिल्या भागात नमूद असणार आहे. दुसऱ्या भागात दोन कप्पे आहेत. मतदाराचे स्वतःचे नाव व अन्य तपशील मागील SIR च्या यादीत सापडले असल्यास (स्व-जुळवणी किंवा self-mapping) तर ते पहिल्या कप्प्यात भरता येतील. मतदाराचे असे तपशील नसल्यास तर त्याच्या आई-वडील/आजी-आजोबा यांच्या मागील SIR च्या यादीतील तपशील (नातेसंबंधी जुळवणी किंवा progeny mapping) दुसऱ्या कप्प्यात भरता येतील. तिसऱ्या भागात मतदाराची जन्म तारीख, मोबाईल क्र., आधार क्र., वडील/आई यांची नावे इत्यादी माहिती भरावयाची आहे व प्रपत्राच्या शेवटी मतदाराने किंवा मतदाराच्या कुटुंबातील प्रौढ सदस्याने स्वाक्षरी करून किंवा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा लावून सदर गणना प्रपत्र BLO कडे द्यावयाचे आहे.
प्रश्न ४: देशामध्ये मागील विशेष सखोल पुनरीक्षण कधी घेण्यात आले होते?
उत्तर: देशामधील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांत २००२ ते २००४ या कालावधीत विशेष सखोल पुनरीक्षण घेण्यात आले होते.
प्रश्न ५: आताच्या पुनरीक्षण कार्यक्रमात मागील SIR ची माहिती का देतली जात आहे?
उत्तर: संविधान व कायद्यातील तरतुदीनुसार भारताच्या कोणत्याही मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक असणे अनिवार्य आहे. सन २००२-२००४ या कालावधीत झालेल्या विशेष पुनरीक्षणामध्ये तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये नाव असणे ही बाब संबंधित मतदाराचा जन्म १ जुलै १९८७ पूर्वी झाल्याचे दर्शविते, जो नागरिकत्व कायद्यातील (Citizenship Act) पहिली cut-off date आहे.
प्रश्न ६: घरभेटीमध्ये मतदारांकडून काय अपेक्षित आहे?
उत्तर: सध्यासमोर ६७ टक्के मतदारांची मागील SIR मधील नावातील नोंदीशी जुळवणी करण्याची कार्यवाही यापूर्वी करण्यात आली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटीच्या वेळी संबंधित मतदाराला किंवा त्यांच्या कुटुंबातील उपस्थित प्रौढ व्यक्तीला ही माहिती दाखवेल व संबंधित मतदाराने/कुटुंबातील व्यक्तीने माहिती बाबतची खातरजमा केल्यानंतर ती माहिती गणना प्रपत्रात नमूद करेल व संबंधित मतदार/व्यक्तीचे नाव व अन्य काही माहिती नमूद करून गणना अर्जावर स्वाक्षरी घेईल. भरलेल्या अर्जाची एक प्रत मतदाराला देण्यात येईल.
प्रश्न ७: ज्या मतदारांची मागील SIR मधील नोंदीशी जुळवणी (Mapping) झालेली नसेल तर अशा प्रकरणी काय कार्यवाही अपेक्षित आहे?
उत्तर: मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अशा मतदाराला त्याच्या २००२ मधील निवासस्थानसंबंधित माहिती (उदा. राज्य, जिल्हा, मतदारसंघ किंवा तालुका) विचारेल. त्याआधारे भारत निवडणूक आयोगाच्या ECINet अॅप किंवा https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावरून त्यांची मागील SIR मधील माहिती उपलब्ध करून देऊ शकेल. मतदार स्वतःसुद्धा BLO च्या घरभेटीच्या आधी ही माहिती वरील अॅप/संकेतस्थळावरून संकलित करून ठेवू शकेल.
प्रश्न ८: BLO च्या घरभेटीच्या वेळी मतदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणतेही प्रौढ सदस्य घरी उपलब्ध नसतील तर अशा व्यक्तीचे गणना प्रपत्र कसे भरले जाईल?
उत्तर: मतदार घरी भेटीवेळी नमूद पत्त्यावर BLO भेट देईल. पहिल्या भेटीत संबंधित मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्याची भेट न झाल्यास किंवा घर बंद अवस्थेत असल्यास BLO च्या दर्शनी क्रमांक दर्शविणारे कागदपत्र (Document) घरात/दरवाजात सरकवून ठेवण्यात येईल. संबंधित मतदार त्या दर्शनी क्रमांकावर संपर्क करून सोयीस्कर वेळ कळवू शकेल, ज्यावेळी गणना प्रपत्र भरण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. तथापि, अशा प्रकारे प्रतिसाद न मिळाल्यास संबंधित BLO आणखी दोन वेळा घरी भेट देईल.
प्रश्न ९: तीन गृहभेटीच्या नंतरही मतदाराच्या अनुपस्थितीमुळे किंवा घर बंद असल्यामुळे गणना प्रपत्र भरणे होता न आल्यास काय होईल?
उत्तर: अशा प्रकरणी अंतिम भेटीच्या वेळी मतदार अनुपस्थित (Absent) किंवा त्या ठिकाणावरून स्थलांतरित झाल्याबाबत निर्देशानुसार आढळल्यास तशी कागदोपत्री नोंद ठेवण्यात येईल व गणना प्रपत्रावर नोंद घेण्यात येईल. अशा मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट होणार नाहीत.
प्रश्न १०: मृत व्यक्तीच्या गणना प्रपत्रावर काय कार्यवाही करण्यात येईल?
उत्तर: मतदार यादीतील सर्व मतदारांसाठी गणना प्रपत्र तयार होतील. गृहभेटीदरम्यान त्यापैकी ज्या मतदारांचे निधन झालेले असेल त्याबाबत संबंधित मतदारांच्या नातेवाईकांकडून प्राप्त माहितीच्या आधारे नोंद घेण्यात येईल व सदर गणना प्रपत्र “Uncollected” या प्रवर्गात मृत या संकेताखाली जमा करून ठेवण्यात येईल व सदर नाव मतदार यादीत समाविष्ट होणार नाही.
प्रश्न ११: एखाद्या मतदाराचे एकापेक्षा दोन ठिकाणी नाव नोंदविलेले असल्यास अशा मतदाराच्या गणना प्रपत्राबाबत काय काळजी घेण्यात येईल?
उत्तर: लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम १७ व १८ येथील तरतुदीनुसार एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त आपले नाव मतदार यादीत नोंदविता येत नाही. तसेच, याच अधिनियमाच्या कलम ३२ नुसार मतदार यादीच्या पुनरीक्षणाच्या अनुषंगाने तसेच मतदार यादीतील नोंदीच्या अनुषंगाने चुकीचे विधान किंवा घोषणा करणाऱ्या व्यक्तीस एक वर्षांपर्यंतचा कारावास किंवा/आणि दंड ही शिक्षा होऊ शकते. राज्यामध्ये ज्या मतदारांची एकापेक्षा जास्त ठिकाणी नावे असतील अशा नावांच्या नोंदी (photo-similar entries) BLO कडे उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदार सध्या राहत असलेल्या ठिकाणचे गणना प्रपत्र मतदाराने भरून व सही करून द्यावयाचे आहे. दुसऱ्या ठिकाणच्या गणना प्रपत्रावर Already Enrolled असे नमूद केले जाईल व त्यामुळे त्या ठिकाणी त्याचे समाविष्ट होणार नाही. एका पेक्षा जास्त ठिकाणी आपले गणना पत्र भरून दिले जाणार नाही, याची दक्षता संबंधित मतदाराने घेणे आवश्यक आहे.
प्रश्न क्र.१२: मतदाराच्या गृहभेटीच्या वेळी गणना प्रपत्राशिवाय अन्य कोणते कागदपत्र मतदाराला द्यावे लागतील?
उत्तर: मतदाराला गणना प्रपत्र भरून व त्यावर स्वाक्षरी करून द्यावी लागेल. ज्याचे मागील SIR मधील नोंदीशी मॅपिंग किंवा जुळवणी झालेली नसेल त्याला आयोगाने विहित केलेल्या दस्तऐवजांपैकी एक वैध दस्तऐवज शोधून ठेवावे लागेल.
प्रश्न क्र.१३: मतदाराला आपले नवीन छायाचित्र उपलब्ध करून देणे आवश्यक आहे काय?
उत्तर: गणना प्रपत्रामध्ये मतदाराच्या सध्याच्या माहितीमध्ये त्याचे मतदार यादीतील छायाचित्र उपलब्ध आहे. मतदारास आपले नवीन छायाचित्र द्यावयाचे असल्यास किंवा मतदार यादीत छापलेले छायाचित्र अस्पष्ट स्वरूपाचे अथवा अप्रमाणित स्वरूपाचे असल्यास संबंधित मतदार आपले नवीन छायाचित्र देऊ शकतो.
प्रश्न क्र.१४: मतदाराला गणना प्रपत्रामध्ये आपला मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे काय?
उत्तर: गणना प्रपत्रामध्ये मोबाईल क्र. नमूद करण्यासाठी रकाना देण्यात आला आहे. मोबाईल क्रमांक देणे अनिवार्य नसले तरी मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिल्यास भविष्यात ऑनलाइन पद्धतीने यादीतील दुरुस्तीसाठी अर्ज करणे, डिजिटल EPIC (मतदार ओळखपत्र) डाउनलोड करणे आणि इतर ऑनलाइन सेवा प्राप्ती अधिक सोपे होईल.
प्रश्न क्र.१५: मतदाराला गणना प्रपत्रामध्ये आपला आधार क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे काय?
उत्तर: गणना प्रपत्रामध्ये मतदार ऐच्छिकपणे आपला आधार क्रमांक नमूद करू शकतात.
प्रश्न क्र.१६: समजा एखाद्या मतदाराची २००२ मधील मतदार यादीतील नोंदीशी जुळवणी (Mapping) झाली नसते किंवा करता आले नाही अशा मतदाराच्या गणना प्रपत्राचे काय होईल?
उत्तर: अशा मतदारानेदेखील आपला गणना प्रपत्र सही करून BLO कडे द्यावयाचा आहे. त्याचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होईल. तथापि, त्यानंतर त्याला आयोगाने निश्चित केलेल्या पुराव्यांपैकी एक पुरावा उपलब्ध करून देण्यास कळविण्यात येईल. सदर पुरावा उपलब्ध करून दिल्यानंतर व आवश्यकतेनुसार सुनावणी घेतल्यानंतर अनुषंगाने मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची खात्री झाल्यास त्याचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट होऊ शकेल.
या प्रक्रियेसाठी प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांच्यासोबत ५ ते १५ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारांना सुनावणीसाठी दूरवर प्रवास करण्याची गरज भासणार नाही.
प्रश्न क्र.१७: आयोगाने ठरवून दिलेल्या पुराव्यांमध्ये कोणत्या कागदपत्रांचा समावेश आहे?
उत्तर: SIR मार्गदर्शक सूचनांमध्ये खालील १७ प्रकारची कागदपत्रे नमूद आहेत:
केंद्र किंवा राज्य शासन अथवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातील (PSU) नियमित कर्मचारी किंवा निवृत्तिवेतनधारक यांना जारी करण्यात आलेले ओळखपत्र किंवा निवृत्तीवेतन देयक आदेश (Pension Payment Order – PPO)
दिनांक १ जुलै १९८७ पूर्वी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, बँका, टपाल विभाग, एलपीजी (LPG) वितरक संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) यांनी जारी केलेले कोणतेही ओळखपत्र, प्रमाणपत्र किंवा दस्तऐवज
सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला जन्म दाखला
पासपोर्ट
मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाने जारी केलेले दहावी (मॅट्रिक) उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा इतर कोणतेही शैक्षणिक प्रमाणपत्र
सक्षम राज्य प्राधिकरणाने जारी केलेले कायमस्वरूपी निवासी प्रमाणपत्र (Permanent Residence Certificate)
वनहक्क प्रमाणपत्र (Forest Rights Certificate)
सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले इतर मागास वर्ग (OBC), अनुसूचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमाती (ST) यांचे जात प्रमाणपत्र
९. लागू असल्यास राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Register of Citizens – NRC) मधील नोंद
१०. राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी तयार केलेली कुटुंब नोंदवही (Family Register)
११. शासनाने जारी केलेले नागरिकत्व किंवा वारस प्रमाणपत्र
१२. आधार कार्ड (केवळ ओळख सिद्ध करण्यासाठी)
मात्र ही यादी अंतिम किंवा मर्यादित नाही. त्यासमतुल्य (Equivalent) कागदपत्रेही स्वीकारली जाऊ शकतात. उदाहरणार्थ, एखाद्याकडे दहावीचे प्रमाणपत्र नसेल, तर शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate), ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा त्यासमान इतर शैक्षणिक कागदपत्र स्वीकारले जाऊ शकते. आवश्यक असल्यास ERO संबंधित शासकीय विभागांकडून या कागदपत्रांची पडताळणी करेल.
प्रश्न क्र.१८ : मतदारांनी वरील सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील का?
उत्तर: नाही. मतदाराने पात्रता सिद्ध करण्यासाठी फक्त एकच वैध कागदपत्र सादर करणे पुरेसे आहे.
प्रश्न क्र.१९ : एखाद्या मतदाराचे मॅपिंग झालेले असले, पण त्यात काही विसंगती (Anomaly) आढळल्यास काय करावे?
उत्तर: सुमारे २० टक्के मॅपिंगमध्ये काही ना काही विसंगती आढळल्या आहेत. उदाहरणार्थ—
आडनावात फरक असणे,
एकाच नावाशी अनेक व्यक्तींची जुळवणी होणे,
वय किंवा इतर तपशीलात तफावत असणे.
अशा वेळी ज्या मुद्द्यावर विसंगती आहे, त्यासंबंधित कागदपत्र सादर करावे लागेल.
उदाहरणार्थ—
विवाहानंतर नाव बदलले असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र पुरेसे ठरू शकते.
वयाबाबत तफावत असल्यास जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला ग्राह्य धरला जाऊ शकतो.
या प्रक्रियेचा उद्देश मतदाराला त्रास देणे नसून, संबंधित विसंगती दूर करणे व पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे हा आहे. सादर केलेल्या कागदपत्रांबाबत ERO समाधानी असल्यास त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
प्रश्न २० : एखादी व्यक्ती तात्पुरती गावाबाहेर असेल किंवा कामानिमित्त दुसरीकडे राहत असेल तर काय?
उत्तर: तात्पुरते स्थलांतर (Temporary Migration) हा कोणताही अडथळा नाही. जर एखादी व्यक्ती महिनाभरासाठी घराबाहेर असेल, तर तिच्या कुटुंबातील कोणताही प्रौढ सदस्य तिच्या वतीने Enumeration Form वर स्वाक्षरी करू शकतो. म्हणून केवळ तात्पुरते बाहेरगावी असल्यामुळे त्या मतदाराच्या पात्रतेवर कोणताही परिणाम होणार नाही.
प्रश्न २१ : मतदार Enumeration Form ऑनलाइन भरू शकतात का?
उत्तर: होय. ही सुविधा ECINET अॅप किंवा https://voters.eci.gov.in/ वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र ऑनलाइन फॉर्म भरल्याने BLO कडून होणारी प्रत्यक्ष घरभेट व पडताळणी रद्द होत नाही. मतदाराने ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड केली, तरी BLO ला संबंधित मतदाराच्या घरी जाऊन पुढील बाबींची प्रत्यक्ष पडताळणी करावी लागेल—
मतदाराची ओळख
राहण्याचा पत्ता
अपलोड केलेल्या कागदपत्रांची सत्यता
यानंतर BLO आपल्या मोबाईल अॅपद्वारे पडताळणीची नोंद करून Enumeration Form व कागदपत्रे ERO किंवा AERO यांच्याकडे पुढील छाननीसाठी पाठवेल.
ऑनलाइन फॉर्म भरलेल्या आणि BLO कडून प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण झालेल्या मतदारांची नावे मसुदा मतदार यादीत समाविष्ट केली जातील. याचा अर्थ, ऑनलाइन अर्ज केला तरी प्रत्यक्ष घरभेटीद्वारे पडताळणी अनिवार्य राहणार आहे.
प्रश्न २२ : शहरामध्ये अनेक जण भाड्याच्या घरात राहतात आणि दिवसभर घरी नसतात. अशा मतदारांची पडताळणी कशी होणार?
उत्तर: यासाठी BLO यांना आवश्यकतेनुसार संध्याकाळच्या वेळेतही घरभेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय २९ जूनपासून ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ECINET मधील “Book a Call” सुविधेच्या माध्यमातून मतदार BLO सोबत संपर्क साधण्यासाठी किंवा भेटीची वेळ निश्चित करण्यासाठी विनंतीही करू शकतात.
प्रश्न २३ : ज्या मतदारांचे गणना प्रपत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे जमा होणार नाहीत त्यांच्याबाबत काय कार्यवाही अपेक्षित आहे?
उत्तर: ज्या मतदारांचे गणना प्रपत्र विहित कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे जमा होणार नाही, अशा व्यक्तींची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होणार नाहीत.
प्रश्न २४ : कोणत्या कारणामुळे अशा प्रकारे गणना प्रपत्र परत प्राप्त होऊ शकणार नाही?
उत्तर: सर्वसाधारणपणे चार कारणांमुळे गणना प्रपत्र पूर्णतः भरून व स्वाक्षरी होऊन प्राप्त न होण्याची शक्यता आहे.
मतदार अनुपस्थित असणे (Absent)
कायमस्वरूपी स्थलांतरित होणे (Shifted)
मृत्यू झालेला असणे (Deceased)
अन्यत्र मतदार म्हणून नोंद झालेली (Already Enrolled)
अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीचे गणना प्रपत्र उपलब्ध न झाल्यामुळे त्यांची नावे प्रारूप (Draft) मतदार यादीत समाविष्ट केली जाणार नाहीत.
प्रश्न २५ : वरील कारणांमुळे प्रारूप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट न झालेल्या व्यक्तींच्या नावांची यादी कुठे पाहता येईल?
उत्तर: प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, ज्या व्यक्तींची नावे वर नमूद कारणांमुळे गणना प्रपत्र उपलब्ध न झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झाले नसतील अशा व्यक्तींच्या नावांच्या याद्या त्याबाबतच्या कारणांसह सार्वजनिक कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना (BLA) सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचप्रमाणे अशा याद्या संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असतील.
प्रश्न २६ : SIR मुळे मतदारांची नावे कमी होणार आहेत अशा शंका उपस्थित केल्या जातात. हे खरे आहे काय?
उत्तर: कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही व कोणताही अपात्र मतदार मतदार यादीत समाविष्ट होणार नाही हे या SIR चे घोषवाक्य आहे. व त्यानुसार हा कार्यक्रम पारदर्शकपणे राबविला जाणार आहे.
प्रश्न २७ : संपूर्ण प्रक्रिया किती पारदर्शक असेल?
उत्तर: या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यात पारदर्शकतेची व्यवस्था करण्यात आली आहे.
अनुपस्थित/स्थलांतरित/मृत/अन्यत्र मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांच्या याद्या सार्वजनिक कार्यालयांमध्ये प्रदर्शित केल्या जातील तसेच मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील. राजकीय पक्षांच्या Booth Level Agents (BLA) यांनाही या याद्या देण्यात येतील आणि ते BLO सोबत संयुक्त पडताळणी करतील. जिथे आवश्यक असेल, तिथे घरभेटीद्वारे घेतलेले छायाचित्र पुरावेही उपलब्ध केले जातील. सर्व पडताळण्या, सुनावण्या आणि कार्यपद्धती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
प्रश्न २८ : नागरिकांकडून काय अपेक्षित आहे?
उत्तर: मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण हा कार्यक्रम मतदारसंघात अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या नव्याने अचूक व दोषविरहित करण्यासाठी राबविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना योग्य माहिती देऊन गणना प्रपत्र भरण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणे आवश्यक आहे. कोणत्याही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार नाही.
प्रश्न २९ : स्वयंसेवी संघटनांकडून काय मदत अपेक्षित आहे?
उत्तर: हा कार्यक्रम राबविताना शहरी भागामध्ये तसेच काही असुरक्षित (Vulnerable) गटातील मतदारांपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना पोहोचण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात. या करिता स्वयंसेवी संघटनांनी सदर राष्ट्रीय कार्यक्रमात आवश्यकतेनुसार मतदार नोंदणी अधिकारी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या समन्वयाने काम करावयाचे आहे.
प्रश्न ३० : ज्या नागरिकांनी १८ वर्षे पूर्ण केली आहेत व ज्यांची नावे अद्याप मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीत त्यांना या विशेष सखोल पुनरीक्षणामध्ये आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी संधी मिळणार आहे किंवा कसे?
उत्तर: दिनांक १.१०.२०२६ पूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नवमतदारांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ECINET किंवा https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म-६ भरावा लागेल. अर्जासोबत आयोगाने विहित केलेले घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे.
प्रश्न ३१ : एखादी अनाथ व्यक्ती आपल्या आई-वडिलांच्या वंशपरंपरेचा (Ancestry/Lineage) पुरावा सादर करू शकत नसेल, तर तिचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी काय व्यवस्था आहे?
उत्तर: अशा प्रकारच्या असुरक्षित (Vulnerable) गटातील व्यक्तींनी भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या दस्तऐवजांपैकी एक वैध दस्तऐवज/कागदपत्र उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. असे दस्तऐवज उपलब्ध झाले नाहीत तर विशेष कार्यपद्धती (Special Procedures) अवलंबिण्यात येतील, जेणेकरून त्यांचे नाव पात्रतेनुसार मतदार यादीत समाविष्ट करता येईल.
प्रश्न ३२ : एखाद्या विवाहित महिलेचे २००२ नंतर विवाहामुळे आडनाव बदलले असल्यास तिने काय करावे? तिचे Mapping विवाहानंतरच्या नवीन आडनावाने २००२ च्या SIR शी होऊ शकेल का?
उत्तर: होय. तिचे Mapping विवाहानंतरच्या नवीन आडनावाने करता येईल. तथापि, प्रणालीमध्ये ते “Logical Discrepancy” किंवा “Anomaly” म्हणून दर्शविले जाईल. अशा परिस्थितीत आडनाव बदलल्याचा आवश्यक पुरावा संबंधित महिलेने सादर करावा.
Shabdraj www.shabdraj.com