14/07/26
Breaking News

सोनं खरेदीची हीच सुवर्णसंधी? सोन्या-चांदीच्या दरात अचानक घसरण

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; 24 कॅरेट सोनं ₹1,42,900 वर
 
मुंबई : मागील काही महिन्यांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठा उलटफेर सुरू आहे. सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर त्यात मोठी घसरण सुरू झाली आहे. उच्चांकी दरापासून जवळपास २० टक्क्यापर्यंत सोन्याचे दर घसरले आहेत. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असतानाच, ज्यांच्या घरात लग्नसराई किंवा इतर मोठे कार्य आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि काहीशी दिलासादायक बातमी आहे.
गगनाला भिडलेल्या सोन्या-चांदीच्या दरांमध्ये आज किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. अमेरिका-इराण दरम्यान पुन्हा एकदा युद्ध भडकलं असताना दुसरीकडे सोनं-चांदीच्या दरात घट झाली आहे.
आज बाजारात सोन्याच्या दरात ०.८६% ची घसरण नोंदवली गेली आहे.

२४ कॅरेट सोन्याचा दर हा प्रति १० ग्रॅम १,४२,९०० रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच मागील व्यवहाराच्या दिवसाच्या तुलनेत यात किरकोळ घसरण झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर हा देखील प्रति १० ग्रॅम १,३०,९९० रुपयांवर व्यवहार करत आहे.सोन्यासोबतच चांदीच्या दरातही किंचित घसरण झाल्याचे दिसून आले आहे. चांदीचा दर हा प्रति किलो २,३४,९०० रुपयांच्या आसपास स्थिरावली आहे.

 

 

सोनं-चांदीचे दर का घसरले?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या  किमतीत झालेल्या वाढीमुळे महागाई आणि व्याजदरांबाबत जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे. या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीतील आपली गुंतवणूक काढून घेत नफावसुली  सुरू केली. परिणामी, दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत ही किरकोळ घसरण पाहायला मिळाली आहे.

ग्राहकांसाठी काय संकेत?

लग्नसराईसाठी किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने जे ग्राहक सोन्याच्या दरात घसरण होण्याची वाट पाहत होते, त्यांच्यासाठी दरात होत असलेली घसरण तात्पुरती का होईना पण दिलासा देणारी आहे. मात्र, बाजार तज्ज्ञांच्या मते, जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणाव  आणि डॉलरची आंतरराष्ट्रीय बाजारातील चाल पाहता, येत्या काही दिवसांत किमतींमध्ये पुन्हा मोठे चढ-उतार पाहायला मिळू शकतात.

 

 

सोनं पुन्हा महाग होणार?

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, जर आंतरराष्ट्रीय बाजारातील युद्धजन्य परिस्थिती किंवा तणाव आणखी वाढला किंवा डॉलर कमकुवत झाला, तर सोन्या-चांदीच्या किमती पुन्हा एकदा रॉकेटच्या वेगाने नवनवे उच्चांक गाठू शकतात. सध्या संपूर्ण कमोडिटी बाजाराचे लक्ष जागतिक आर्थिक संकेतांवर लागून राहिले आहे.
ग्राहकांनी सोने खरेदी करताना नेहमी BIS हॉलमार्क (Hallmark) अवश्य तपासावा आणि पक्के बिल घेण्यास विसरू नये. तसेच चांदी खरेदी करतानाही तिची शुद्धता आणि चालू बाजारभावाची खात्री करूनच व्यवहार करावा.

 

Check Also

एका दिवसासाठी CM झालात तर?:तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर; म्हणाले..

who is Tukaram Mundhe ? राज्यातील अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त म्हणून धडाकेबाज कारवायांमुळे …