14/07/26
Breaking News

कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन,दोन अधिकाऱ्यांचा होणार सन्मान…

परभणी,दि 08 ः
परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ग्रामविकासामध्ये मोलाचे योगदान देणारे परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र ओमप्रकाश यादव आणि हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र नानासाहेब कदम यांचा परभणीमध्ये ” कृतज्ञता सोहळा”आयोजित करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये हरित ग्राम चळवळ राबविणारे आणि सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी (सामान्य प्रशासन विभाग) पदावर विराजमान असलेले ओमप्रकाश यादव आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये गावपातळीवर वाचनालय आणि ग्रामविकास उपक्रम राबविणारे तथा मुंबई येथे इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाचे मंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी असलेले नानासाहेब कदम यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांचा ता. (११) सोमवार रोजी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात दुपारी : २.०० वा. सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव आहेत. तर मुख्य अतिथी व मार्गदर्शक म्हणून रयत शिक्षण संस्था, साताराचे अध्यक्ष तथा सत्त्व फाउंडेशनचे चंद्रकांत दळवी यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी ज्येष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ व शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर, साद माणुसकीची फाउंडेशनचे हरीश बुटले, लोकजागरमंचचे संस्थापक – अध्यक्ष अनिल गावंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूरच्या प्राचार्या श्वेता ओमप्रकाश यादव आणि सौ. सुवर्णा नानासाहेब कदम यांचाही विशेष सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या सोहळ्याचे आयोजन जिजाऊ ज्ञानतीर्थ, परभणी आणि संकल्प स्वराज्य उभारणीचा फाउंडेशन, परभणी आणि सर्व मित्र परिवार परभणीकर यांच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास साध्य केलेल्या गावातील गावकरी आणि समाजातील अनेक गुणीजनांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. अनेकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Check Also

हिंगोली जिल्हा परिषदेत ‘राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान’ अंतर्गत विभागप्रमुखांचे प्रशिक्षण संपन्न!

​१६ व्या वित्त आयोगाच्या निधीचा प्रभावी वापर आणि शाश्वत विकासाच्या नियोजनावर भर; मुख्य कार्यकारी अधिकारी …