26/08/26
Breaking News

BLO ड्युटीचा ताण जीवावर? शिक्षक रवि स्वामी यांचे हृदयविकाराने निधन; व्यवस्थेवर गंभीर आरोप

कामाच्या ताणामुळे शिक्षकाचा मृत्यू? शांतीनिकेतन विद्यालयाचे सहशिक्षक रवि स्वामी यांचे निधन; शिक्षक परिषदेची शासनाकडे १ कोटींच्या मदतीची मागणी

परभणी / प्रतिनिधी – परभणी शहरातील गंगाखेड रोडवरील शांतीनिकेतन विद्यालयात कार्यरत असलेले सहशिक्षक रवि शिवलिंग स्वामी (वय ५४) यांचे गुरुवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, सततच्या प्रशासकीय कामांच्या ताणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवि स्वामी यांच्यावर अध्यापनासोबतच बीएलओ (BLO) ची जबाबदारी होती. याशिवाय जनगणना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पोटनिवडणुका, विविध ऑनलाइन प्रशासकीय कामे तसेच टीईटी (TET) परीक्षेसंदर्भातील जबाबदाऱ्या यामुळे त्यांच्यावर मोठा कामाचा ताण होता. हा ताण सहन करणे कठीण जात असल्याची भावना त्यांनी वेळोवेळी आपल्या मित्रमंडळींना व पत्नीला व्यक्त केली होती, अशी माहिती समोर आली आहे.

 

 

कुटुंबीय व सहकाऱ्यांच्या माहितीनुसार, बुधवारी बीएलओ कामाच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झालेल्या बैठकीत त्यांना सुनावल्याने ते मानसिक तणावाखाली होते. त्यानंतर त्यांना रात्री झोपही लागली नसल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले.

 

 

पालम तालुक्यातील रहिवासी असलेले रवि स्वामी हे विद्यार्थीप्रिय, मनमिळावू आणि सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेणारे शिक्षक म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई ललिताबाई, पत्नी सविता आणि दोन मुली असा परिवार आहे.

 

 

दरम्यान, शिक्षणमहर्षी पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे प्रदेश सहसचिव नवनाथ जाधव यांनी या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “रवि स्वामी यांचा मृत्यू हा शिक्षकांवरील वाढत्या प्रशासकीय कामाच्या ताणाचा परिणाम असून, ही शासन व्यवस्थेच्या धोरणामुळे झालेली दुःखद घटना आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने १ कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.

 

 

या घटनेमुळे शिक्षकांवरील वाढता प्रशासकीय ताण, निवडणूक व इतर शासकीय कामांचा अतिरिक्त भार याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

 

टीप : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे किंवा कामाच्या ताणामुळेच मृत्यू झाला, हा दावा संबंधितांकडून करण्यात आला असून, त्याबाबत अधिकृत चौकशी किंवा वैद्यकीय निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत.

Check Also

टोलेजंग इमारत सज्ज, तरी वाचक प्रतीक्षेत! हिंगोलीतील नवीन जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन कधी?

​हिंगोली (विशेष प्रतिनिधी): हिंगोली शहरातील महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्हा ग्रंथालयाची भव्य आणि …