“प्रश्न विचारले म्हणून मारहाण? बिडकरांचा थेट सवाल; भ्रष्टाचाराविरोधात लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार!”
दै. शब्दराज / रामप्रसाद ओझा, गंगाखेड – लोकशाहीमध्ये जनतेने आणि माध्यमांनी लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारू नयेत का? प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देणे ही त्यांची जबाबदारी आहे, असे परखड मत धनगर समाजाचे युवा कार्यकर्ते महेश बिडकर यांनी व्यक्त केले. भ्रष्टाचाराविरोधातील आपला लढा कोणत्याही दबावाला किंवा धमकीला न जुमानता सुरूच राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
महेश बिडकर यांच्या वतीने मंगळवार, दि. १४ जुलै रोजी गंगाखेड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महेश बिडकर यांना मारहाण झाल्याच्या घटनेनंतर गंगाखेडमध्ये राजकीय व सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. या मारहाणीच्या निषेधार्थ दि. ११ जुलै रोजी धनगर समाज बांधव व समविचारी संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या प्रकरणात पोलीस प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी तसेच दाखल करण्यात आलेले कथित खोटे गुन्हे दोन दिवसांत मागे घ्यावेत, अन्यथा पालम येथे शनिवारी भव्य निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा धनगर समाजाचे युवा नेते पवन करवर यांनी दिला.
पत्रकार परिषदेत महेश बिडकर यांनी थेट आरोप करत सांगितले की, डॉ. आ. रत्नाकर गुट्टे यांचे कार्यकर्ते बाबा पोले यांच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला करण्यात आला. पोलीस ठाण्यात संपणारे प्रकरण पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर घडले आणि तेथे मला मारहाण करण्यात आली. माझ्याकडे असलेल्या ऑडिओ व व्हिडिओ क्लिपमध्ये संबंधित बाबी स्पष्ट दिसत असून, त्या पत्रकारांसमोर सादर केल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी तसेच माझ्यावर दाखल करण्यात आलेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.
प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबणे लोकशाहीसाठी घातक
लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारू नयेत का? असा थेट सवाल उपस्थित करत बिडकर म्हणाले, लोकशाही टिकवायची असेल तर सत्ताधाऱ्यांना जनतेसमोर उत्तर द्यावेच लागेल. जनतेच्या प्रश्नांना सामोरे जाणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. मात्र प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा लोकशाहीवरील थेट आघात आहे. भ्रष्टाचाराला माझा ठाम विरोध असून, कोणत्याही दबावाला न जुमानता भ्रष्टाचाराविरोधातील लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना बिडकर यांनी उत्तरे दिली. यावेळी फोटो, ऑडिओ व व्हिडिओ क्लिप दाखवत त्यांनी आपल्याकडील पुरावे पत्रकारांसमोर सादर केले.
यावेळी महेश बिडकर यांच्यासह श्रीकांत भोसले, कॉ. योगेश फड, जितेश गोरे, पवन करवर, अर्जुन गाडेकर, माणिक पोले, स्वप्नील बिडकर, गणेश पोले, मोहन गित्ते, हिमगिरे आदी उपस्थित होते.
बिडकर यांच्यावरील गुन्हे मागे घ्या; अन्यथा शनिवारी पालममध्ये प्रचंड मोर्चा — पवन करवर
महेश बिडकर यांच्यावर गंगाखेड पोलीस प्रशासनाने दाखल केलेले कथित खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. संबंधित ठाणेदाराला निलंबित करून दोन दिवसांत लेखी निर्णय द्यावा. अन्यथा शनिवारी पालम येथे सर्व समाजबांधवांच्या वतीने महेश बिडकर यांच्या समर्थनार्थ व पोलीस प्रशासनाच्या विरोधात प्रचंड निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा धनगर समाजाचे युवा नेते पवन करवर यांनी दिला.
लोकशाही वाचली पाहिजे, हुकूमशाही गेली पाहिजे — श्रीकांत भोसले
महेश बिडकर यांच्यावर अन्याय झाला असून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर त्यांना मारहाण झाली. संविधानाचा चुकीचा वापर होत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे. लोकशाही वाचली पाहिजे आणि हुकूमशाही गेली पाहिजे, असे स्पष्ट मत मराठा समाजाचे नेते श्रीकांत भोसले यांनी व्यक्त केले.
अन्यायाविरोधात आवाज उठवला म्हणून आम्ही बिडकर यांच्या सोबत — कॉ. योगेश फड
गंगाखेड शहरासह बिडकर यांच्या गावातील कथित बोगस कामे व भ्रष्टाचार उघड केल्यामुळे जुना व्हिडिओ शेअर करून महेश बिडकर यांना बेदम मारहाण करण्यात आली, हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. लोकशाहीमध्ये आवाज उठवणे गुन्हा आहे का? महेश बिडकर यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आलो आहोत, असे कॉ. योगेश फड यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही महेश बिडकर यांच्या सोबत आहोतच; मात्र कोणत्याही समाजातील कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर पक्षीय विचारधारा बाजूला ठेवून त्याच्या पाठीशी कायम उभे राहू, असे जितेश गोरे यांनी स्पष्ट केले.
Shabdraj www.shabdraj.com