जोर धरलेल्या पावसाने सोमवारी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अक्षरशः कहर केला. अनेक भागात पूरपरिस्थिती उद्भवली असून, काही ठिकाणी दरडी कोसळल्या. दरम्यान मंगळवारीही मुंबईसह अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः घाटाच्या क्षेत्रात येणाऱ्या भागात पावसाचा जोर जास्त असेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
पावसाचा कहर मंगळवारी (७ जुलै) कायम राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने नवीन माहिती जाहीर केली असून, मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने म्हटले आहे की, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तर दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोव्यात ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
“असे असले तरी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहू शकतो. मुंबईसाठी दुसरी मोठी चिंतेची बाब म्हणजे वेगवान वारे. तुम्ही पाहू शकता की, आज वाऱ्याचा वेग खूप जास्त होता आणि वाऱ्याचा वेग ताशी सुमारे ७०-८० किमीपर्यंत पोहोचले होते. एवढ्या वेगवान वाऱ्यांमुळे जुनी आणि मोठी झाडे उन्मळून पडू शकतात, तसेच कच्ची घरे आणि जुन्या इमारतींनाही धोका निर्माण होऊ शकतो. अशा भागात राहणाऱ्या लोकांनी सावध राहावे”, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Shabdraj www.shabdraj.com