16/10/26
Breaking News

इंद्रायणीच्या पुरात परभणीतील वारकऱ्यांची वाहने अडकली

आषाढी वारीसाठी आळंदी येथे दाखल झालेल्या परभणी तालुक्यातील वडगाव सुक्रे येथील वारकऱ्यांना इंद्रायणी नदीच्या पुराचा मोठा फटका बसला. मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने ठाकूरबुवा मठ परिसरात पुराचे पाणी शिरले. या पुरात वारकऱ्यांसाठी नेण्यात आलेले किराणा साहित्य, अन्नदानासाठी जमा केलेली रोख रक्कम तसेच इतर आवश्यक साहित्य वाहून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.

या घटनेत एमएच-३८ ई-२५९३ क्रमांकाची सोपान अशोकराव सुक्रे (रा. वडगाव सुक्रे) यांची बोलेरो पिकअप पुराच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. तसेच माऊली सूर्यभान कोपनर यांची बोलेरो पिकअपही पुराच्या पाण्यात अडकून पूर्णपणे जलमय झाली. अचानक आलेल्या पुरामुळे वारकरी आणि वाहनचालकांची एकच धावपळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी तातडीने आळंदी येथील प्रशासनाशी दूरध्वनीवरून संपर्क साधत मदतकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या. अडकलेल्या वारकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविणे, पुरात अडकलेली दोन्ही वाहने बाहेर काढण्यासाठी यंत्रणा तैनात करणे तसेच आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले. त्यांच्या हस्तक्षेपानंतर स्थानिक प्रशासनाने बचाव व मदतकार्याला वेग दिला.

वारीसाठी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणलेले अन्नधान्य, किराणा साहित्य आणि अन्नदानासाठी जमा केलेली रक्कम पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने वारकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून शासनाने तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी वारकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Check Also

CBSE च्या 2027 परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पाहा, कधी असू शकते परीक्षा ?

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयानुसार परीक्षेच्या तारखा, …