07/08/26
Breaking News

ढगफुटीचा इशारा… पण ढगफुटी म्हणजे काय? नेमका किती पाऊस पडतो?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, काही ठिकाणी आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) नाशिक जिल्ह्यासाठी गंभीर इशारा जारी केला आहे. आज नाशिकमध्ये ढगफुटीसदृश अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, जिल्ह्यासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

 

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. काल मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटनाही घडल्या, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.

 

संभाव्य ढगफुटीचा धोका लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी गडकिल्ले, डोंगराळ भाग आणि धबधब्यांच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पर्यटनस्थळांवर आणि प्रमुख धबधब्यांजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.

 

ढगफुटी म्हणजे काय?
ढगफुटीला इंग्रजीमध्ये क्लाऊडबर्स्ट (Cloudburst) असे म्हणतात. या शब्दाचा शब्दशः अर्थ ‘ढग फुटणे’ असा होतो. मात्र, प्रत्यक्षात ढग फुटत नाहीत. ढगफुटी म्हणजे एखाद्या मर्यादित परिसरात अत्यंत कमी वेळेत प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळण्याची हवामानविषयक घटना होय.

 

भारतीय हवामान विभागाच्या व्याख्येनुसार, साधारण 20 ते 30 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात एका तासात 100 मिलीमीटर (10 सेंटीमीटर) किंवा त्याहून अधिक पाऊस पडल्यास त्या घटनेला ढगफुटी म्हणतात. सामान्य भाषेत सांगायचे झाल्यास, आकाशातून पाऊस पडत नसून जणू एखादी मोठी पाण्याची टाकीच फुटली आहे, इतक्या वेगाने आणि अचानक पाणी कोसळते.

 

ढगफुटीची घटना प्रामुख्याने डोंगराळ भागात घडते. ओलसर हवा डोंगराच्या उतारावरून वर चढत असताना ती थंड होते आणि त्यातील बाष्पाचे वेगाने पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेमुळे क्युम्युलोनिंबस (Cumulonimbus) प्रकारचे उंच, दाट आणि प्रचंड आकाराचे ढग तयार होतात. हे ढग मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवण करतात आणि वातावरणातील अनुकूल परिस्थितीत अचानक अतिवृष्टी घडवून आणतात.

 

मात्र, प्रत्येक मुसळधार पाऊस म्हणजे ढगफुटी असे नाही. अतिशय कमी वेळात, अत्यंत मर्यादित क्षेत्रात आणि असामान्य प्रमाणात पाऊस पडल्यासच त्या घटनेला ढगफुटी असे संबोधले जाते.

 

ढगफुटीची प्रमुख कारणे
उष्ण आणि दमट हवेचा वेगाने वर जाणारा प्रवाह.
उंच पर्वतरांगांमुळे हवेला अचानक वर उचलले जाणे (ओरोग्राफिक प्रभाव).
ढगांमध्ये पाण्याचे थेंब आणि बर्फकण मोठ्या प्रमाणात साचणे.
वातावरणातील अनुकूल परिस्थितीमुळे हा साठा अचानक खाली कोसळणे.

 

 

ढगफुटीच्या वेळी काय करावे?
नदी, नाले आणि पूरप्रवण भागांपासून दूर राहावे.
स्थानिक प्रशासन व हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.
डोंगराळ भागात तातडीने सुरक्षित व उंच ठिकाणी जावे.
अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे.

Check Also

पहिली कर्जमाफी कोणी केली? कसा होता निर्णय….

Who implemented the first loan waiver? शेती आणि नैसर्गिक संकटे यांचे नाते फार जुने आहे. …