राजस्थान: सध्या इंडस्ट्रीमधील लग्नसराईला वेग आला आहे. नुकतंच बोनी कपूर यांची लेक अंशुला कपूरचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. अशातच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेले अभिनेते आणि प्रख्यात कवी शैलेश लोढा यांच्या घरीही सध्या आनंदाचे वातावरण आहे. शैलेश लोढा यांची लाडकी लेक स्वरा विवाहबंधनात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर ६ जुलै रोजी हा दिमाखदार सोहळा पार पडला.
स्वराचे पती शाश्वत हे सिंगापूरमध्ये एका नामांकित बँकिंग कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. या लग्नसोहळ्यातील एक अतिशय भावनिक आणि सुंदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यात बॉलीवूडचा हँडसम हंक विकी कौशल सर्वांचे मन जिंकताना दिसतोय.स्वरा आणि शाश्वत यांचा हा विवाह सोहळा राजस्थानमधील जोधपूर येथील ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध उम्मेद भवन पॅलेसमध्ये अत्यंत शाही पद्धतीने पार पडला. संपूर्ण लग्न पारंपरिक मारवाडी रीतिरिवाजांनुसार पार पडले. या शाही लग्नाला चित्रपटसृष्टी, साहित्य क्षेत्र आणि राजकीय जगतातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. मात्र, या सगळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो अभिनेता विकी कौशल.
शैलेश लोढा यांच्यासोबत विकीचं जवळचं नातं
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये विकी कौशलचा एक अत्यंत देखणा अंदाज पाहायला मिळत आहे. विकीचे मंडपात आगमन होताच शैलेश लोढा यांनी त्याला मिठी मारून त्याचे स्वागत केले. त्यानंतर विकीने नववधू स्वराची भेट घेऊन तिला मिठी मारत लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. तिथे उपस्थित सर्व पुरुषांनी डोक्यावर पारंपरिक मारवाडी फेटा बांधला होता. अशातच विकी कौशल स्वतः अत्यंत प्रेमाने शैलेश लोढा यांच्या डोक्यावरील फेटा नीट करताना दिसला. विकीचा हा कौटुंबिक अंदाज पाहून चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Shabdraj www.shabdraj.com