पूर्णा | प्रतिनिधी
पूर्णा शहरात दूध भेसळीचा संशय निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली असून, घरात तापवण्यासाठी ठेवलेल्या दुधाचे रबरसदृश घट्ट पदार्थात रूपांतर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित दूध विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
माहितीनुसार, शहरातील कोळीवाडा परिसरातील धारेश्वर संतोष भंगे यांनी सराफा बाजार परिसरात दूध विक्री करणाऱ्या एका खाजगी विक्रेत्याकडून अर्धा लिटर दूध खरेदी केले. घरी आणल्यानंतर दूध तापवण्यासाठी ठेवले असता काही वेळातच त्याचा रंग व पोत बदलू लागला आणि ते रबरसदृश घट्ट पदार्थात परिवर्तित झाल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहून कुटुंबीयांना धक्का बसला.
घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना व अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आली. त्यानंतर अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक चौकशी केली. संशयित दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित दूध विक्रेत्याची चौकशी सुरू असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तपासात दुधात भेसळ अथवा अन्य अनियमितता आढळल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
या घटनेनंतर शहरातील खाजगी दूध विक्रीबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दूध विक्री करणाऱ्या सर्व विक्रेत्यांची नियमित तपासणी करून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता सर्वांचे लक्ष प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लागले आहे.

Shabdraj www.shabdraj.com