23/10/26
Breaking News

एकदा लाट उसळली तर दिल्लीकडे जाऊ शकतो- मनोज जरांगे पाटील

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 10 वा दिवस असून राज्य सरकारने अद्यापही त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य न केल्याने उपोषण सुरूच आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला होता, मी त्यांच्याशी फोनवरुन बोललो. हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाल्यानंतर हा फोन आला होते, तेव्हा या जीआरनुसार एकही मराठा  वंचित राहू देणार नाही, असे फडणवीसांनी म्हटल्याचे जरांगे पाटलांनी सांगितले.

“सरकार जाणून बुजून हयगय, हलगर्जीपणा करत आहे. मराठ्यांचा रोष वाढत आहे. मराठा संपवण्यासाठी जाणूनबुजून हलगर्जीपणा चालला आहे. आपण सरकारला 12 तारखेपर्यंतचा वेळ दिलाय. सगळ्या मंत्र्यांनी सांगितले होते, तुम्हाला उपोषणाची वेळ येणार नाही म्हणून. मार्च, फेब्रुवारीला प्रसाद लाड म्हटले होते, आम्हाला बोलवा. ते म्हणाले, फडणवीस मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करतील. म्हणून लाड यांना बोलावले होते, एक वर्षात त्यांनी काही केले नाही.”, असे म्हणत जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केलं.

मला फडणवीसांचा फोन आला होता, तो नाही म्हंटला तर मी सगळे सांगतो, आमच्याकडे CCTV फुटेज पण आहेत, असे म्हणत जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. फडणवीसांनी सांगितल म्हणून आम्ही विश्वास ठेवला. फक्त सातारा, कोल्हापूरमध्ये दोन महिने थांबा म्हणाले, मी त्यांना भाऊ म्हटले. मी बोलत नव्हतो, पण बोललो, त्यांना बोला भाऊ म्हटले. मला राजकारणाचं देणं घेणं नाही असे मी म्हटल्याची माहिती जरांगे यांनी दिली. तो (फडणवीस) गोड बोलून पायाखाली घालतो, एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे, महाजनांचे घर याने पायाखाली घातले. निलंगेकरांचे घर पायाखाली घ्यायची स्टाईल, तावडेचे घर पायाखाली, गडकरीचे घर पायाखाली… मी शेकडो उदाहरण देतो असे म्हणत जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार टीका केली. या जीआरनुसार एकही मराठा वंचित राहू देणार नाही, असे फडणवीसांनी म्हटले होते, हैदराबाद गॅझेटचा जीआर काढल्यावर मला दोन महिन्याने फोन आला होता, अशी माहिती जरांगेंनी दिली.

राजे अन् एकनाथ शिंदेंवरही टीका

नारायण राणे साहेबांचे, अशोकराव चव्हाण, विखे साहेबांचे घर पायाखाली घातलं. राजगादीचे सगळे राजे चिडचूप बसले आहेत. कोल्हापूर आणि साताऱ्याच्या गादीची एवढी वाईट वेळ येऊ नये, असे म्हणत राजेंनाही जरांगे पाटलांनी लक्ष्य केलं. तसेच, एकनाथ शिंदे म्हणायाला मला आता लाज वाटते, त्याने मराठ्यांचा तळतळाट घेतला तो आपला नाही, अशी बोचरी टीका एकनाथ शिंदेंवर जरांगेंनी केली.

राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला फडणवीस जबाबदार असतील, हे मोदी आणि अमित शहा यांनी लक्षात ठेवावे. एकदा लाट उसळली तर दिल्लीकडे जाऊ शकतो, मग सगळे बंगाल, पंजाब, सगळीकडे जाऊ. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी फडणवीसांना समजून सांगावे. कारण, देवेंद्र फडणवीसांमुळे आंदोलन चिघळू शकतो. सव्वा ते तीन करोड मराठा मुंबईत येऊ शकतो, यावेळी आंदोलकांनी स्व-संरक्षासाठी झाडू ठेवावा, आजपासून कामाला लागा, सर्वांनी 12 तारखेला अंतरवालीमध्ये यायचं आहे, असे आवाहनही मराठा बांधवांना जरांगे पाटलांनी केले.

उदय सामंतांची विनंती, उपोषण सोडावे

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मंत्र उदय सामंत यांनी भाष्य केलंय. विखे पाटील यांनी आत्ताच ऑनलाईन बैठक घेतली आहे, मीही त्यात होतो, सगळे अधिकारी त्यात होते, आम्ही यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या माध्यमातून देखील मी जरांगे पाटील यांना विनंती करेल की, त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, प्रश्न सुटतच राहणार आहेत, पण आपली प्रकृती, आपला जीव देखील महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने त्यांनी आंदोलन स्थगित करावं, अशी विनंती उदय सामंत यांनी चंद्रपूर दौऱ्यात असताना केली. दरम्यान, ओबीसी समाजाचं आरक्षण कुठल्याही प्रकारे कमी होणार नाही असं महायुती सरकारचं धोरण आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील हे घोषित केलं आहे की, ओबीसी समाजाच्या कुठल्याच आरक्षणाला धक्का लागणार नाही, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

Check Also

CBSE च्या 2027 परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पाहा, कधी असू शकते परीक्षा ?

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयानुसार परीक्षेच्या तारखा, …