17/07/26
Breaking News

विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा : खासदार संजय जाधव यांचे कुलगुरूंना पत्र

परभणी, दि. ८ : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील प्रकल्पग्रस्तांच्या भरती प्रक्रियेला होणारा विलंब लक्षात घेता खासदार संजय जाधव,आमदार डॉ.राहुल पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी कुलगुरूंना पत्र देत भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात कुलगुरूंना दिलेल्या पत्रात खासदार जाधव,आमदार डॉ.राहुल पाटील यांनी नमूद केले की, विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रिया जुलै २०२५ पासून सुरू असून वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. त्यामुळे गेल्या एका वर्षापासून ही प्रक्रिया रखडली असून प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच, राज्यातील इतर कृषी विद्यापीठांमध्ये, जसे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रिया राबवून नियुक्ती आदेश देण्यात आल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

परभणी येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी व घरे १०० टक्के संपादित करण्यात आली असून त्यांच्याकडे उपजीविकेचे कोणतेही साधन उरले नसल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याचेही खासदार जाधव यांनी म्हटले आहे. प्रकल्पग्रस्तांनी यासंदर्भात आंदोलन व उपोषणाचा मार्ग अवलंबल्याचाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

खासदार जाधव यांनी विद्यापीठ प्रशासनाला १५ जून २०२६ नंतर भरती प्रक्रियेला मुदतवाढ देऊ नये, तसेच लेखी व तोंडी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करून शासन निर्णयानुसार तात्काळ भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली आहे. या पत्राची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.याबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे,शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु मुरकुटे,भाजपा महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे,लोकशासन आंदोलन पार्टीचे सचिन काळे,मनसेचे जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख यांनी ही निवेदन दिले आहे.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …