17/07/26
Breaking News

अतिक्रमण नोटिशींनी घाबरू नका, घरे नियमित करणार: आमदार तानाजी मुटकुळे यांचे आवाहन

हिंगोली: शहरात फलटण मोंढा आणि रिसाला बाजार भागात अतिक्रमण संदर्भात नागरिकांना प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ज्या नागरिकांच्या घराच्या जागेवर सातबारा उताऱ्यामध्ये ‘सरकार’ असे नमूद आहे, अशाच लोकांना या नोटिसा मिळाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, २०११ पूर्वीच्या सर्व रहिवाशांची घरे शासन निर्णयानुसार (GR) नियमित केली जाणार असून, नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरून जाण्याची गरज नाही, असे ठाम प्रतिपादन हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी केले.
रिसाला बाजार परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका महत्त्वपूर्ण कॉर्नर बैठकीत आमदार मुटकुळे बोलत होते. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२०० ते ३०० वर्षांपूर्वीची जुनी वस्ती
बैठकीत नागरिकांशी संवाद साधताना आमदार तानाजीराव मुटकुळे म्हणाले की, फलटण मोंढा आणि रिसाला बाजार भागातील ही घरे आजची नसून, जवळपास दोनशे ते तीनशे वर्षांपूर्वीची जुनी घरे आहेत. या भागातील नागरिकांचे पिढ्यानपिढ्या येथे वास्तव्य आहे. त्यामुळे केवळ सातबारा उताऱ्यावर ‘सरकार’ नाव आहे म्हणून कोणाचेही घर पाडले जाणार नाही. २०११ पूर्वी जे नागरिक वास्तव्यास आहेत, त्यांना हक्काचे घर नियमित करून देण्याचा स्पष्ट जीआर सरकारने काढलेला आहे.
महसूल मंत्र्यांसोबत तातडीने बैठक
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार मुटकुळे यांनी पुढाकार घेतला आहे. “उद्याच या भागातील सर्व नागरिकांची आवश्यक ती कागदपत्रे जमा केली जातील. त्यानंतर महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा संपूर्ण विषय त्यांच्या कानावर घातला जाईल आणि नागरिकांना न्याय मिळवून दिला जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
१५०० स्क्वेअर फुटांपर्यंत जागा मिळणार विनामूल्य!
शासकीय नियमांची माहिती देताना आमदारांनी स्पष्ट केले की:
सरकार तर्फे १५०० स्क्वेअर फूट एवढी जागा नागरिकांना पूर्णपणे विनामूल्य (regularize) करून दिली जाणार आहे.
जर एखाद्या नागरिकाची जागा १५०० स्क्वेअर फुटांपेक्षा जास्त असेल, तर त्या अतिरिक्त जमिनीवर अगदी नॉमिनल (नाममात्र) टॅक्स भरून ती जागा देखील संबंधित नागरिकाच्या नावावर करून दिली जाईल.
दलालांच्या आमिषाला बळी पडू नका!
“या संवेदनशील परिस्थितीचा फायदा घेऊन काही जण नागरिकांची दिशाभूल करण्याची किंवा आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रिसाला बाजार आणि फलटण मोंढा भागातील नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना किंवा कुणाच्याही आमिषाला बळी पडू नये. आमदार म्हणून मी पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा आहे,” असे जाहीर आवाहन आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी यावेळी केले.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …