17/07/26
Breaking News

रिवा येथे घटनेच्या निषेधार्थ जैन समाजाने काढला मोर्चा

हिंगोली,दि 25 (प्रतिनिधी) ः
मध्य प्रदेशातील रीवा येथे जैन साध्वींसोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी हिंगोली यांना निवेदन देण्यात आले. विहाररत जैन साधू-संतांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था लागू करावी तसेच संबंधित घटनेची निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, २० मे २०२६ रोजी रीवा जिल्हा मुख्यालयाजवळ राष्ट्रीय संत आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांच्या शिष्या आर्यिका श्री १०५ प्रभुमती व आर्यिका श्री १०५ उपशममती माताजी यांच्या संदर्भातील दुर्घटनेमुळे जैन समाजात तीव्र दुःख आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना केवळ अपघात नसून तिची निष्पक्ष, पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी समाजाने केली आहे.
सकल जैन समाजाने निवेदनात म्हटले आहे की, जैन साधू-संत हे अहिंसक, तपस्वी आणि पायी विहार करणारे असल्याने त्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. विहार मार्गांवर प्रशासकीय समन्वय, संवेदनशील भागांत पोलीस मदत, वाहतूक नियंत्रण, चेतावणी फलक आणि विशेष सुरक्षा प्रोटोकॉल लागू करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच केंद्र सरकारने “राष्ट्रीय संत सुरक्षा नीती” जाहीर करून पायी विहार करणाऱ्या संतांसाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines), सुरक्षा SOP आणि संवेदनशील मार्गांसाठी विशेष तरतुदी कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यासोबतच संतांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना विशेष संवेदनशील श्रेणीत समाविष्ट करावे तसेच “Sant Security Coordination Cell” स्थापन करून प्रशासन व समाज यांच्यात समन्वय यंत्रणा उभारावी, अशीही मागणी करण्यात आली.
या निवेदनावर सकल जैन समाज हिंगोलीच्या पदाधिकाऱ्यांसह समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या असून, निवेदनाच्या प्रती भारत सरकारचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, अल्पसंख्याक मंत्री, पालकमंत्री हिंगोली आणि पोलीस अधीक्षक हिंगोली यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …