Ajit Seeds hit by defective cotton seeds case
परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील गोपेगाव येथील शेतकऱ्याने सदोष कापूस बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीबाबत दाखल केलेल्या दिवाणी दाव्यात गंगाखेड येथील दिवाणी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने अजीत सीड्स लिमिटेड आणि त्यांच्या अधिकृत विक्रेत्याला शेतकऱ्यास १ लाख ५० हजार रुपये नुकसानभरपाई तसेच दावा दाखल केल्याच्या तारखेपासून निकालापर्यंत ९ टक्के वार्षिक व्याज देण्याचे आदेश दिले आहेत. निर्धारित मुदतीत रक्कम न भरल्यास १२ टक्के दराने व्याज आकारण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
गोपेगाव येथील शेतकरी अशोक गणेश गिराम यांनी २०१६ मध्ये अजीत सीड्स कंपनीचे १२ बॅग कापूस बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करून आपल्या शेतात लागवड केली होती. सुरुवातीला पिकाची उगवण समाधानकारक झाली; मात्र नंतर कापसाच्या बोंडांवर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनाचे मोठे नुकसान झाले. यानंतर त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली. कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा करून जिल्हा तक्रार निवारण समितीकडे अहवाल सादर केला. समितीने केलेल्या तपासणीत कापूस पिकाचे सुमारे ८० टक्के नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले असून शेतकऱ्याचे किमान ७३ हजार ३८२ रुपयांचे नुकसान झाल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला होता.
या प्रकरणात शेतकऱ्याने ऍड. डी.पी. झुटे यांच्या मार्फत नुकसानभरपाईची मागणी करत न्यायालयात दावा दाखल केला होता. कंपनीने आपल्या बचावात हवामान, शेती व्यवस्थापन, खतांचा वापर आणि इतर तांत्रिक कारणांमुळे नुकसान झाल्याचा युक्तिवाद केला. तसेच बियाण्यांमध्ये दोष नसल्याचे सांगत दावा फेटाळण्याची विनंती केली. मात्र सुनावणीदरम्यान जिल्हास्तरीय समितीच्या तपासणीवेळी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित असूनही त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नव्हता. तसेच बियाणे दोषमुक्त असल्याचे कोणतेही ठोस वैज्ञानिक किंवा तांत्रिक पुरावे कंपनीकडून सादर करण्यात आले नाहीत, अशी नोंद न्यायालयाने केली.
न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केले की, शेतकऱ्याने खरेदी केलेले बियाणे सदोष असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांच्या अहवालातून आणि साक्षीदारांच्या पुराव्यांतून स्पष्ट होते. त्यामुळे शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळण्याचा अधिकार सिद्ध झाला आहे.
१३ जुलै २०२६ रोजी गंगाखेड येथील दिवाणी न्यायाधीश गजानन भा. यादव यांनी हा निकाल दिला. सदोष बियाण्यांमुळे नुकसान झाल्याचा दावा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, बियाणे उत्पादक कंपन्यांच्या जबाबदारीबाबतही या निकालातून स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
Shabdraj www.shabdraj.com