हिंगोली,दि 08 ः
हिंगोली पालिकेच्या सभागृहात सोमवार, ८ जून रोजी कंत्राटी कर्मचारी भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. नगरपालिकेचे गटनेते श्रीराम बांगर आणि मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. नगरपालिकेचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या या भरती प्रक्रियेचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. या बैठकीला आऊटसोर्सिंग कंपनीचे प्रमुख, पालिकेचे उपाध्यक्ष तसेच विविध नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंगोली नगरपालिकेमध्ये सध्या आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून विविध विभागांतील रिक्त जागांवर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते, त्या सर्वच उमेदवारांना आजच्या बैठकीसाठी पाचारण करण्यात आले होते. बैठकीदरम्यान उपस्थित सर्व उमेदवारांच्या कामाच्या अनुभवाबाबतची माहिती प्रत्यक्ष जाणून घेण्यात आली. ज्या उमेदवारांना संबंधित कामाचा पूर्वअनुभव आहे, अशा उमेदवारांना प्राधान्याने नियुक्ती देण्यासंदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
पगार आणि सुविधा आऊटसोर्सिंग कंपनीमार्फतच
“सदर कर्मचाऱ्यांची भरती ही संपूर्णतः आऊटसोर्सिंगच्या (बाह्यस्रोत) माध्यमातून केली जात आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे मानधन, पगार आणि इतर ज्या काही आवश्यक कायदेशीर सुविधा असतील, त्या सर्व आऊटसोर्सिंग कंपनीच्या माध्यमातूनच दिल्या जातील,” असे गटनेते श्रीराम बांगर यांनी यावेळी स्पष्ट केले.
कामचुकारपणा खपवून घेणार नाही; बांगर यांचा इशारा
या आढावा बैठकीमध्ये गटनेते श्रीराम बांगर यांनी पालिकेच्या सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांना वेळेवर आणि प्रामाणिकपणे काम करण्याच्या कडक सूचना दिल्या. विशेषतः शहराच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या स्वच्छता विभागाच्या कामकाजावर त्यांनी नाराजी व्यक्त करत मुख्याधिकाऱ्यांना थेट निर्देश दिले. स्वच्छता विभागामध्ये कार्यरत असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना केवळ कार्यालयामध्ये बसवून न ठेवता, त्यांना प्रत्यक्ष प्रभागात आणि मैदानावर कामाला लावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांना दिल्या.
शहरातील विकासकामे आणि नागरी सुविधा वेळेत पूर्ण करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची ही भरती महत्त्वाची ठरणार असून, अनुभवी हातांना काम मिळणार असल्याने पालिकेच्या कारभारात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Shabdraj www.shabdraj.com