26/08/26
Breaking News

भरधाव आयशरची दुचाकीला धडक एक जागीच ठार

पूर्णा, दि. ८ 
पूर्णा–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ वरील गोर शिवार, नोबेल्टी बिअर बारसमोर बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. अपघाताची नोंद चुडावा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख सतार शेख जुल्केकर (वय ४५, रा. मेहबूब मंजिलजवळ, आनंदनगर, परभणी) हे आपल्या एमएच-२२/एजे-०१५६ क्रमांकाच्या दुचाकीवरून पूर्णा येथून चुडावाकडे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच-२६/सीपी-१९१७ क्रमांकाच्या आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला आणि शेख सतार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पूर्णा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. तसेच अपघातग्रस्त वाहन जप्त करून पुढील तपास सुरू करण्यात आला.

या अपघातामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनी महामार्गावर वाढत्या भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करत संबंधित प्रशासनाने वेग नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

Check Also

टोलेजंग इमारत सज्ज, तरी वाचक प्रतीक्षेत! हिंगोलीतील नवीन जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन कधी?

​हिंगोली (विशेष प्रतिनिधी): हिंगोली शहरातील महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्हा ग्रंथालयाची भव्य आणि …