14/07/26
Breaking News

राज्यात पावसाची पुन्हा ओढ; तापमानात वाढ, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Todays Maharashtra Weather Update 14 july 2026

मुंबई – राज्यात यंदा हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्रपणे जाणवत असून, प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीचा यंदाच्या मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा चढ-उतारांचा राहण्याचा अंदाज आहे.

 

यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील नागरिकांना दीर्घकाळ तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला. अनेक भागांत उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. जूनमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतरही उकाडा कायम राहिला. गेल्या काही दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा वगळता राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

 

सध्या मान्सूनने विश्रांती घेतल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात पुन्हा वाढ होत आहे. नागरिकांना उष्णतेच्या झळा पुन्हा जाणवू लागल्या असून, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवारी राज्यातील कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

 

पुढील काही दिवस पावसाची शक्यता कमी

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यभर व्यापक पावसाची शक्यता कमी आहे. मान्सूनला सक्रिय ठेवणाऱ्या हवामान प्रणाली सध्या कमकुवत असल्याने बहुतांश भागांत केवळ तुरळक हलक्या सरींची शक्यता आहे.

 

 

मंगळवार आणि बुधवारी राज्यातील बहुतांश भागांत हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर बुधवार ते शनिवार या कालावधीत विदर्भातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या सरींची नोंद होऊ शकते.

 

 

सध्या राज्यातील जवळपास निम्म्या भागात पावसाची मोठी तूट असून अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामाबाबत चिंता वाढत आहे.

गेल्या आठवड्यात काही राज्यांत झालेल्या मुसळधार पावसानंतर आता देशभरात मान्सूनचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. यामुळे शेतीसमोर नवे संकट उभे राहिले आहे. भारतीय हवामान विभागाने मंगळवारी काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असला, तरी व्यापक स्वरूपाचा पाऊस अद्याप अपेक्षित नाही.

 

 

केंद्र सरकारनेही कमजोर मान्सून आणि घटलेल्या पेरणीबाबत चिंता व्यक्त केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशातील ३७२ जिल्ह्यांमध्ये मान्सून कमकुवत राहिला असून, त्यापैकी ६८ जिल्ह्यांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. तसेच २० जुलैपर्यंत देशभरात व्यापक पावसाची शक्यता कमी असल्याने शेतकरी आणि कृषी क्षेत्राची चिंता आणखी वाढली आहे.

Check Also

581 विद्यार्थ्यांची उत्तरे शब्दशः एकसारखीच,26 शिक्षक निलंबित

वाशिम,दि 17 ः शिक्षकांनीच १२वीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिममधील एका महाविद्यालयात …