मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. अंतरवाली सराटी येथून त्यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. ५८ लाख कुणबी नोंदींची प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी येत्या २९ ऑगस्ट रोजी शेवटचे आणि निर्णायक आंदोलनाची मोठी घोषणा केली आहे. समाजाला वेड्यात काढले जात असल्याचा आरोप करत जरांगे यांनी आरपारच्या लढाईचे रणशिंग फुंकले आहे.
५८ लाख प्रमाणपत्रांसाठी अल्टिमेटम
मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाला जाणीवपूर्वक वेड्यात काढण्याचे काम सध्या सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या या लढ्याला येत्या २९ ऑगस्टला बरोबर ३ वर्षे पूर्ण होत आहेत. सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करूनही अद्याप प्रमाणपत्रे का वाटली नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. येत्या २८ ऑगस्टपर्यंत सरकारने ५८ लाख नोंदी सापडलेल्या बांधवांना प्रमाणपत्रे द्यावीत, अन्यथा २९ ऑगस्टपासून तुकडा पडेपर्यंत आमचे शेवटचे आणि निर्णायक आंदोलन सुरू होईल, असा अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिला आहे.
मराठ्यांनाच टार्गेट का करताय?
मनोज जरांगे म्हणाले की, समाजातील मुलांचे सध्या मोठे हाल होत आहेत. त्यांच्या भविष्यासाठी आपण गेल्या तीन वर्षांपासून रक्त आटवत आहोत. सरकारने आधी स्थानिक चौकशी अहवाल आणला, मात्र तरीही मराठ्यांनाच टार्गेट का केले जात आहे? असा जाब त्यांनी विचारला. आता हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रे पदरात पाडून घेतल्याशिवाय आपण कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
एकानेही घरी थांबू नका’; समाजाला आवाहन
२९ ऑगस्टचे आंदोलन हे आरक्षणाच्या लढाईतील शेवटचे पाऊल असणार आहे. त्यामुळे या निर्णायक आंदोलनात समाजातील एकानेही घरी थांबू नये, असे आवाहन जरांगे यांनी केले. तसेच, ज्या मराठा बांधवांना आपल्या नोंदी सापडल्याचे माहीत आहे, त्यांनी अजिबात वेळ न घालवता तात्काळ प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जरांगेंचे नेत्यांनाही आवाहन
यावेळी बोलताना त्यांनी राजकीय नेत्यांनाही वास्तवाची जाणीव करून दिली. ‘सध्या सर्वपक्षीय नेत्यांच्या मुलांना आरक्षण लागत नसले तरी, भविष्यात त्यांच्याही मुलांना या आरक्षणाची गरज लागणार आहे,’ असे सांगत जरांगे पाटील यांनी नेत्यांनाही समाजाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
स्वतंत्र मराठा मंत्रालय, सारथी योजना आणि नियुक्त्यांवर सरकारला सवाल
उपसमितीच्या बैठका घेऊन प्रश्न सुटणार नसल्याचे सांगत त्यांनी स्वतंत्र मराठा मंत्रालयाची मागणी पुन्हा लावून धरली. तसेच, २९ ऑगस्टला मराठा समाजाच्या प्रश्नांना विरोध करणाऱ्या नऊ मंत्र्यांची नावं जाहीर करणार असल्याचा दावा त्यांनी केला.
सरकारने तातडीने निर्णय घ्यावा
जरांगे पाटील म्हणाले, अण्णासाहेब पाटील महामंडळ, सारथीच्या योजना आणि मराठा तरुणांच्या नियुक्त्यांबाबत सरकारने अन्याय केला आहे. मला कोणतंही पद किंवा लाभ नको, मराठा समाजाच्या मुलांना न्याय द्या. २९ ऑगस्टला गावागावातील मराठे वाघासारखे रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, मराठा समाजाला दुजाभाव का केला जातो, असा सवाल करत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
Shabdraj www.shabdraj.com