18/07/26
Breaking News

 पाऊस झाला तरी पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाचे आवाहन

हिंगोली,दि 09 
हिंगोली शहरासह जिल्हाभरात सोमवारी (ता. 8) दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र सदर पाऊस पेरणीसाठी पुरेसा नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

हिंगोली जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मृगाच्या पहिल्याच दिवशी पावसाची प्रतिक्षा होती. मृग नक्षत्राच्या दुसऱ्या दिवशी दुपारी जिल्हाभरात ढग दाटून आले होते. त्यानंतर काही वेळातच सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. कळमनुरी तालुक्यात विजेच्या कडकडाटात पाऊस झाला. त्यानंतर वसमत, औंढा नागनाथ, हिंगोली तालुक्यातही जोरदार पाऊस झाला आहे.

वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागात काही ठिकाणी घरावरील टीनपत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. दुपारी पाऊस थांबल्यानंतर टीनपत्रे गोळा करण्यासाठी गावकऱ्यांची मोठी धावपळ झाली होती. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर विज पुरवठा खंडीत झाला होता. सुमारे एक ते दिड तासानंतर विज पुरवठा सुरळीत झाला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतिक्षा असून मोठ्या पावसानंतर पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. तर दुसरीकडे या पावसानंतर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी धावपळ सुरु केल्याचे चित्र आहे.

दरम्यान, या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र पेरणीसाठी हा पाऊस पुरेसा नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. किमान 100 मिलीमिटर पाऊस झाल्या शिवाय पेरणीची घाई करू नये. तसेच पेरणी करतांना जास्त खोलवर बियाणे पडणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Check Also

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड

जिंतुर,दि 17 पत्रकारांच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची …