17/07/26
Breaking News

महावितरण अंतर्गत  भ्रष्टाचाराची  चौकशी करा,मा.आ.विजय भांबळे आक्रमक

परभणी,दि 09
जिंतूर-सेलू तालुक्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यात सुरू असलेले अन्यायकारक भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे तसेच महावितरण अंतर्गत झालेल्या फिडर सेपरेशन व दुरुस्तीच्या कामांमधील प्रचंड भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी  मागणी माजी आमदार विजय भांबळे यांनी मंगळवा (दि.09)  अधीक्षक अभियंता, परभणी यांच्याकडे केली आहे.

राज्यात उष्णतेची तीव्र लाट असताना आणि तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले असताना सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत करण्यात येणाऱ्या भारनियमनामुळे शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, बालके आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्याला भारनियमनमुक्त घोषित केले असतानाही जिंतूर-सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यात सक्तीचे भारनियमन सुरू ठेवण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

महावितरणच्या RDSS T-27 गावठाण फिडर सेपरेशन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता, निकृष्ट दर्जाची कामे आणि तब्बल १००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. JACK SON, POLY CAB आणि ASHOKA BIDCON या संबंधित कंपन्यांसह काही अधिकारी यांच्या संगनमताने शासनाची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

कामांमध्ये कमी वजनाचे व कमी उंचीचे पोल वापरणे, अंदाजपत्रकापेक्षा कमी क्षमतेचे कंडक्टर टाकणे, जास्तीचे पोल दाखवून बोगस बिले काढणे, निकृष्ट दर्जाचे काँक्रीटीकरण करणे, रेतीऐवजी डस्टचा वापर करणे, पोल आणि ट्रान्सफॉर्मर नियमबाह्य पद्धतीने उभारणे, अर्थिंगची कामे निकृष्ट दर्जाने करणे, रोड क्रॉसिंग आणि शाळा परिसरात आवश्यक सुरक्षा उपाय न करणे, धोकादायक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसविणे, काटेरी तार, डेंजर बोर्ड व इतर सुरक्षाविषयक साहित्य अत्यल्प प्रमाणात वापरणे अशा अनेक गंभीर बाबी निदर्शनास आणून देण्यात आल्या.

अनेक गावांमध्ये मंजूर असूनही गावठाण फिडरची सुविधा देण्यात आलेली नाही. काही ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑईल गळती होत असून अनेक ठिकाणी कामे पूर्ण झाल्याचे दाखवूनही प्रत्यक्षात वीजपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. तसेच मागील तीन वर्षांतील मेंटेनन्स, LCP आणि DPDC अंतर्गत झालेल्या कामांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि उपकंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यांना काळ्या यादीत टाकावे तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कामांची बिले रोखावीत, अशी ठाम मागणी करण्यात आली.

यावेळी जिंतूर तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत, सेलू तालुकाध्यक्ष सुधाकरराव रोकडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष केशवराव बुधवंत, जिल्हा परिषद सदस्य कृष्णकांत देशमुख, माणिकराव हरकळ, शंकर जाधव, पंचायत समिती सदस्य प्रशांत नाईक, जीवन आवटे, बाजार समिती संचालक अप्पासाहेब डख, नंदकुमार अंभोरे, अविनाश मस्के, नगरसेवक अशोकराव बंड, जाबेर भाई, करीम लाला, मनोज राऊत, कैलास महाराज देशमुख चारठाणकर, खयुम कादरी, चंद्रकांत गाडेकर, शुभम कदम, रामेश्वर गाडेकर, संतोषराव पावडे, प्रवीण महाजन, भागवत बालटकर, आबासाहेब मोगल, पांडुरंग मोगल, छत्रगुण मोगल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …