१६ व्या वित्त आयोगाच्या निधीचा प्रभावी वापर आणि शाश्वत विकासाच्या नियोजनावर भर; मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे प्रतिपादन
हिंगोली – राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत पंचायत विकास आराखडा अधिक प्रभावीपणे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार करण्यासाठी हिंगोली जिल्हा परिषदेच्या वतीने सोमवारी जिल्हास्तरीय विभागप्रमुखांचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड हे होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी पंचायत विकास आराखड्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले,
”ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी ‘पंचायत विकास आराखडा’ हा पाया आहे. स्थानिक पातळीवरील प्रत्यक्ष गरजा आणि समस्या ओळखून जर आपण काटेकोर नियोजन केले, तरच उपलब्ध शासकीय निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर होईल. या प्रभावी नियोजनामुळेच ग्रामीण भागाच्या विकासाला खऱ्या अर्थाने अधिक गती मिळेल.”
या महत्त्वाच्या प्रशिक्षण मध्ये प्रामुख्याने १५ जून २०२६ रोजीच्या नवीन शासन निर्णयानुसार तांत्रिक व धोरणात्मक विषयांवर सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले.
शाश्वत विकास ध्येये पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन विकास डोळ्यांसमोर ठेवून आराखडा कसा तयार करावा, हे समजावून सांगण्यात आले.
विविध योजनांचे अभिसरण वेगवेगळ्या योजनांची सांगड घालून एकाच कामासाठी जास्तीत जास्त संसाधने कशी उपलब्ध करता येतील, यावर चर्चा झाली.
१६ व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर करताना कायदेशीर बाबी आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक आहे, याची माहिती देण्यात आली.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना पंचायत विकास आराखड्याची पार्श्वभूमी समजावून सांगत प्रशिक्षणाचा उद्देश स्पष्ट केला.
‘यशदा’ चे प्रशिक्षक श्री. पट्टेबहादुर आणि श्री. मोहरील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com