29/07/26
Breaking News

पाथरी तालुक्यात ‘संकल्प मानव विकास संस्था’तर्फे १२ गावांत आरोग्य शिबिरे; १,६६८ मुलांची तपासणी

पाथरी / प्रतिनिधी – स्थलांतरित कामगारांच्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन संकल्प मानव विकास संस्था यांच्या वतीने पाथरी तालुक्यातील १२ गावांमध्ये विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. दिनांक २० फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेण्यात आलेल्या या शिबिरांमध्ये एकूण १,६६८ मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

मसलातांडा, कानसुर, नाथरा, जवळाझुटा, बाबुलतार, टाकळगव्हाण, गुंज उमरा, पाथरगव्हाण बु., देवनांद्रा, बोरगव्हाण आणि पाथरगव्हाण खु. या गावांमध्ये ही शिबिरे पार पडली. संस्थेचे कार्यकारी संचालक सुधाकर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरांमध्ये स्थलांतरित मजुरांची मुले तसेच स्थानिक जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

स्थलांतरित मुलांच्या आरोग्याला प्राधान्य
पाथरी तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार व इतर मजुरांचे स्थलांतर होत असते. या स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या आरोग्याकडेही अनेकदा दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन संकल्प मानव विकास संस्थेने या १२ गावांची निवड करून मुलांपर्यंत थेट आरोग्य सेवा पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेतला.

या शिबिरासाठी पाथरी तालुका आरोग्य विभागाने मोलाचे सहकार्य केले. आरोग्य विभागामार्फत तज्ज्ञ डॉक्टर, ए.एन.एम. (ANM) आणि एम.पी.डब्ल्यू. (MPW) यांची उपलब्धता करून देण्यात आली. या वैद्यकीय पथकाने प्रत्येक गावात जाऊन मुलांची सखोल तपासणी केली.

या तपासणीत कुपोषण, रक्ताल्पता (ॲनिमिया), डोळ्यांचे विकार तसेच विविध संसर्गजन्य आजार यांची तपासणी करण्यात आली. ज्या मुलांना पुढील उपचारांची आवश्यकता आहे, त्यांना तज्ज्ञांकडून योग्य सल्ला व संदर्भ सेवा देण्यात आली.

यावेळी बोलताना संस्थेचे कार्यकारी संचालक सुधाकर क्षीरसागर म्हणाले, “स्थलांतरित कामगारांची मुले कोणत्याही मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित राहू नयेत, हेच आमच्या संस्थेचे मुख्य ध्येय आहे. शिक्षण हा मुलांचा हक्क आहेच, पण आरोग्य ही त्यांची प्राथमिक गरज आहे. पाथरी तालुक्यातील प्रत्येक मुलाला हक्काचे आरोग्य कवच मिळावे, यासाठी आमची संस्था कटिबद्ध आहे.”

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संबंधित गावांतील सरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच गाव बाल संरक्षण समितीच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. शिक्षकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत अशा शिबिरांमुळे मुलांच्या आरोग्याबाबत पालकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होत असल्याचे सांगितले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे प्रकल्प समन्वयक सावन जोंधळे, कार्यक्रम व्यवस्थापक विठ्ठल साळवे, समन्वयक बालासाहेब खोपे, उमेश कांबळे, शामल शेरकर, पूजा कदम, अश्विनी डोंगरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

सावधान भगर खाताय… मग हे वाचाच…!

शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक उपवास …