27/07/26
Breaking News

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; अपक्ष देशमुख ठरणार का गेमचेंजर?

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष
परभणी / प्रतिनिधी – परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होईल, अशी अपेक्षा असताना अपक्ष उमेदवार सुशील सुरेशदादा देशमुख यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक तिरंगी झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणे नव्याने मांडली जात असून ही लढत अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

महायुतीकडून शिवसेना (शिंदे गट)चे सईद खान, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे डॉ. विवेक नावंदर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोघांच्या अपेक्षित लढतीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सुरेशदादा देशमुख यांचे सुपुत्र सुशील देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत निवडणूक तिरंगी केली आहे.

 

मतदारसंघातील पक्षीय संख्याबळाचा विचार केला तर महायुतीचे पारडे वरचढ असल्याचे दिसते. एकूण ४६८ मतदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे १३१, भारतीय जनता पक्षाचे ९९ आणि शिवसेना (शिंदे गट)चे ७७ असे मिळून महायुतीकडे ३०७ सदस्यांचे संख्याबळ आहे. याशिवाय यशवंत सेनेचे २७ आणि जनसुराज्य पक्षाचे १३ सदस्य महायुतीच्या बाजूने झुकलेले मानले जात आहेत.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे ५९ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ४३ असे एकूण १०२ सदस्यांचे संख्याबळ आहे. त्यामुळे कागदोपत्री महायुती अधिक मजबूत दिसत असली तरी स्थानिक राजकारणातील अंतर्गत नाराजी आणि अपक्ष उमेदवारीमुळे निवडणुकीचे चित्र अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.

 

उमेदवारी अर्ज दाखल करतानाच दोन्ही आघाड्यांमधील मतभिन्नता उघड झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांच्या उमेदवारी अर्जावेळी काँग्रेसमधील काही प्रमुख नेते उपस्थित राहिले असले तरी अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि स्थानिक नेते अनुपस्थित होते. त्याचवेळी काही काँग्रेस व शिवसेना नेत्यांनी सुशील देशमुख यांच्या उमेदवारी अर्जावेळी उपस्थिती लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.

 

महायुतीतही असेच चित्र दिसून आले. सईद खान यांच्या उमेदवारी अर्जावेळी महायुतीतील काही प्रमुख नेते उपस्थित असले तरी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही प्रभावी लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. तसेच काही इच्छुकांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अंतर्गत नाराजी समोर आली होती. नंतर काही उमेदवारांनी माघार घेतली असली तरी राजकीय मतभेद पूर्णपणे मिटल्याचे चित्र दिसत नाही.

 

उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असले, तरी मतदानापर्यंत पडद्यामागील राजकीय घडामोडी आणि स्थानिक स्तरावरील गटबाजी निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे महायुतीचे सईद खान, महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख यांच्यातील तिरंगी सामना राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेत आहे.

Check Also

सावधान भगर खाताय… मग हे वाचाच…!

शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक उपवास …