छत्रपती संभाजीनगर: येत्या सप्टेंबर महिन्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या वतीने देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ हे व्यापक आंदोलन आणि मोहीम राबवली जाणार आहे. देशातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात येत असल्याची घोषणा ‘सीजेपी’चे अभिजीत दीपके यांनी केली आहे. या मोहिमेत त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिल.
पत्रकार परिषदेत अभिजीत दीपके यांनी देशातील सध्याच्या गंभीर परिस्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले, सध्या देशात शिक्षण व्यवस्था सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेली आहे. बेरोजगारीचा प्रश्न इतका भीषण बनला आहे की, ज्यांच्याकडे डिग्री आहेत तेही आज बेरोजगार फिरत आहेत. देशात 60 टक्के जनता ही 35 वर्षांखालील आहे. परंतु, बहुतांश तरुणांकडे नोकऱ्या नाहीत.जंतरमंतरवरील आंदोलनाचा उल्लेख करत ते म्हणाले, जंतरमंतरवर फक्त विद्यार्थी नव्हते तर अनेक बे रोजगार तरुणही होते. या आंदोलनाने देशात प्रश्न विचारण्याची जी भीती निर्माण झाली होती, ती पूर्णपणे संपवून टाकली आहे. शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी हा केवळ ‘जेन झी’चा (Gen Z) विषय नव्हता. देशाचे भविष्य आज अशिक्षित किंवा अल्पशिक्षित लोकांच्या हाती गेले आहे, ज्यांच्याकडे साधी डिग्रीही नाही ते सरकार चालवत आहेत. दुसरीकडे सामान्य नागरिकांसाठी कोर्टाकडे वेळ नाही, ज्यामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे.
कोणतीही एक व्यक्ती या समस्या दूर करू शकत नाही. त्यामुळेच राजकारणाच्या पलीकडे जाऊन, एक नागरिक म्हणून देश सुधारण्यासाठी ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिला आहे, त्या सर्वांना सोबत घेऊन ही चळवळ पुढे नेली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘कॉकरोच जनता पार्टी’चे महत्त्वाचे संकल्प
राजकारणाशी न जोडता निव्वळ समाजकारण करण्याच्या उद्देशाने ‘सीजेपी’ आगामी काळात खालील मुद्द्यांवर काम करणार आहे.
- शिक्षण व्यवस्था: शिक्षणातील वाढत्या अडचणी आणि व्यापारीकरणाविरोधात पहिला मोठा लढा उभारणे.
- न्याय व्यवस्था: सर्वसामान्यांना त्वरित आणि न्याय्य न्याय मिळावा यासाठी न्यायव्यवस्थेत सुधारणांची मागणी करणे.
- बेरोजगारी दूर करणे: पदवीधर असूनही बेरोजगार असणाऱ्या आणि अल्प वेतनावर काम करणाऱ्या तरुणांच्या हक्कासाठी आवाज उठवणे.
- ‘सीजेपी’ला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सोबत घेऊन पक्षाचा विस्तार करणे आणि राजकीय स्वार्थाऐवजी समाजकारणाला प्राधान्य देणे
Shabdraj www.shabdraj.com