पूर्णा / प्रतिनिधी — प्रस्तावित असलेल्या रेल्वे बायपास प्रकल्पाविरोधात आज नगर परिषद सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, नागरिक, स्थानिक शेतकरी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम , जाकीर कुरेशी , विशाल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.बैठकीमध्ये सर्वांनी एक मताने या बायपास प्रकल्पाचा तीव्र निषेध व्यक्त केला. या प्रकल्पामुळे शेकडो कुटुंबांचे पुनर्वसन, शेतीचे नुकसान आणि शहराच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. शहराच्या विकासाला बाधा पोहचेल व परिणामी आर्थिक व सामाजिक जीवनावर परिणाम होईल.स्थानिकांशी सल्लामसलत न करता हा निर्णय केंद्र सरकारने घेतला. रेल्वे प्रशासनाने नागरिकांची, लोकप्रतिनिधी,शेतकऱ्यांची व स्थानिक प्रतिनिधींची योग्य ती चर्चा न करता निर्णय घेतल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी असा इशारा दिला की जर बायपास प्रकल्प रद्द करण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्या बाबतीत लवकरच एक जनआंदोलनाची रणनिती ठरवण्यात येणार आहे. यावेळी विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचार मांडले. प्रास्ताविक बैठकीचे संयोजक प्रदीप नन्नवरे यांनी केले. सूत्रसंचालन ॲड एम. ए.सईद यांनी केले तर सुधाकर खराटे यांनी आभार मानले
सर्व नेत्यांना ही नम्र विनंती आहे विकास करता आला नाही तर करू नका पण पुर्णा जंक्शनचे महत्व कमी होऊ देऊ नका
सर्वांनी या रेल्वे बायपास लढ्यात सहभाग घेतला पाहिजे.
सामाजिक कार्यकर्ते प्रदिप नन्नवरे
Shabdraj www.shabdraj.com